
पुणे: वैष्णवी हगवणे (Vaishanvi Hagawane) मृत्यू प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरलं आहे. वैष्णवीने सासरच्या जाचाला आणि छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी माहिती समोर आली. मात्र, ही आत्महत्या (Vaishnavi Hagawane Suicide Case) नसून, हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला, आणि हे प्रकरण संपूर्ण राज्यात तापले. या प्रकरणात वैष्णवीची मोठी जावबाई मयुरी हगवणे जगताप (Mayuri Jagtap) हिची जबानी महत्वपूर्ण ठरली. मयूरीचा देखील सासरच्यांकडून अमानुष छळ करण्यात आला. ज्याची माहिती स्वतः मयूरीने प्रसारमाध्यमांसमोर दिली, आणि संपूर्ण हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनामांचा बुरखा फाडला गेला.
वैष्णवीप्रमाणे मयूरीला देखील सासरचा जाच आणि छळ सहन करावा लागला. याबाबत मयुरीच्या आईने गेल्यावर्षी राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी 'X' वर याबाबतचे पुरावे शेअर केले आहेत. दमानिया यांनी मयुरीची आई लता जगताप यांनी राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्राचे फोटो शेअर केले आहेत. हे पत्र मयुरीच्या आईकडून राज्य महिला आयोगाकडून ईमेल करण्यात आले होते.
राज्य महिला आयोगाने मयूरीच्या आईने केलेल्या तक्रारीकडे केले दुर्लक्ष?
हगवणे कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीबाबत मयूरीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे 6 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्याविरुद्ध तक्रार करणे हेतू ईमेल केला होता. या ईमेलचे पुढे काय झाले? याबाबत अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले आहेत.
महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का ?
वैष्णवी चा जीव वाचला नसता का ?
वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला email करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो व तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली . ती… pic.twitter.com/cR6WRXwEW1
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 23, 2025
"महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो आणि तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे. आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमधे उल्लेख आहे. महिला आयोगाने ह्यावर कारवाई का नाही केली? ह्याचे उत्तर हवे आहे. वेळच्यावेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती", अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी महिला आयोगाला सुनावले आहे.
मयुरीच्या आईने ईमेल मार्फत महिला आयोगाला पाठवलेली चिठ्ठी केली शेअर
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मयुरीच्या आईने महिला आयोगाला पाठवलेली चिठ्ठी देखील सोशल मिडियावर शेअर केली आहे. या चिठ्ठीत हगवणे कुटुंबियांवर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
वाचा संपूर्ण पत्र
"माझी मुलगी सौ. मयुरी सुशील हगवणे हिचे 20 मे 2022 रोजी श्री. सुशील राजेंद्र हगवणे (रा. भुकुम ता. मुळशी) यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेद्र हगवणे यांनी आम्हाला फॉरच्यूनर पाहीजे आणि पैसे पाहिजे अशा मोठ्या गाड्यांच्या आणि रोख रकमेची मागणी करुन तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना ह्या घटना वारंवार घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण केली आणि सांगितलं की, तुला वडील नाहीत. तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारुन टाकू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकडं करु शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्यामागे मोठा राजकीय पाठिंबा आहे. अशाप्रकारच्या धमक्या देऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आम्ही सामंजस्याने हा वाद मिटवत होतो. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पौड पोलीस स्टेशन तालुका मुळशी येथे तक्रार दाखल केली. पण त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू-सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करु लागले. तिच्या पतीचा ह्या गोष्टीला नकार असल्याने त्यचा राग हा मुलीवर काढत होते." असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे.