Friday, May 23, 2025

देशमहत्वाची बातमीअर्थविश्व

भारतात आयफोन बनवल्यास २५% टॅरिफ लावणार, ट्रम्पने दिली अ‍ॅपलला धमकी

भारतात आयफोन बनवल्यास २५% टॅरिफ लावणार, ट्रम्पने दिली अ‍ॅपलला धमकी

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Us President Donald Trump) यांनी भारतात आयफोन बनवण्याबद्दल पुन्हा एकदा अ‍ॅपलला धमकी दिली आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी भारतात बनवल्या जाणाऱ्या आयफोनवर आक्षेप घेत म्हंटले की, "अमेरिकेत विकले जाणारे आयफोन भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नव्हे, तर अमेरिकेतच बनवले पाहिजेत." ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना यापूर्वी देखील याबद्दल सांगितले होते, मात्र त्यावेळी टीम कूक यांनी ते जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी अ‍ॅपलच्या सीईओना "ॲपलने अमेरिकेत आयफोन तयार केले नाहीत, तर कंपनीला किमान २५% टॅरिफचा सामना करावा लागेल." असा दमच भरला. (Donald Trump warned Apple CEO Tim Cook)



ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथद्वारे ॲपलवर २५% कर लादण्याची दिली धमकी 


ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथद्वारे टिम यांना थेट धमकीवजा संदेश लिहिला आहे.  त्यांनी लिहिले की, "मी ॲपलच्या टिम कुकला खूप आधी कळवले होते की अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेतच बनवले जातील, भारतात किंवा इतर कुठेही नाही. जर त्यांनी असे केले नाही तर, ॲपलला किमान २५% दराने शुल्क भरावे लागेल."



ॲपलची उत्पादने भारतात बनवण्याच्या विरोधात ट्रम्प


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ॲपलची उत्पादने भारतात तयार होण्याच्या विरोधात आहेत.  गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी कंपनीचे सीईओ टिम कुक यांना सांगितले होते की भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. गुरुवारी (१५ मे) कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी अ‍ॅपलच्या सीईओंसोबत यासंदर्भात बोलणी झाल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले होते की, ॲपलला आता अमेरिकेत उत्पादन वाढवावे लागेल. असे असूनही, ॲपलची सर्वात मोठी कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने भारतात १.४९ अब्ज डॉलर्स (सुमारे १२,७०० कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. फॉक्सकॉनने त्यांच्या सिंगापूर युनिटद्वारे गेल्या ५ दिवसांत तामिळनाडूच्या युझान टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही गुंतवणूक केली आहे.



अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतातले


अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मुख्य देश असल्याचे कुक यांनी सांगितले. भारताव्यतिरीक्त व्हिएतनाममध्ये अमेरिकेत विकले जाणारे अ‍ॅपलचे काही उत्पादने बनवले जातात. ज्यामध्ये एअरपॉड्स, अ‍ॅपल वॉच सारखी इतर उत्पादने असल्याची त्यांनी माहिती दिली.



ॲपलचा भारताकडे जास्त कल असण्याची कारणे


फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, ॲपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्याची पुरवठा साखळी चीनबाहेर हलवण्यावर बऱ्याच काळापासून काम करत आहे. जर ॲपलने या वर्षाच्या अखेरीस त्यांची असेंब्ली भारतात हलवली, तर २०२६ पासून दरवर्षी येथे ६ कोटींहून अधिक आयफोन तयार होतील. हे सध्याच्या क्षमतेच्या दुप्पट आहे.  ॲपल भारतात बनवलेल्या त्यांच्या ७०% आयफोनची निर्यात करते, ज्यामुळे चीनच्या तुलनेत भारतातील कमी आयात शुल्काचा फायदा होतो. २०२४ मध्ये भारतातून आयफोन निर्यात १२.८ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹१,०९,६५५ कोटी) पर्यंत पोहोचली. येणाऱ्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.


सध्या आयफोनच्या उत्पादनात चीनचे वर्चस्व जास्त आहे. ॲपलच्या उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेता, ॲपलला चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे.  तसेच भू-राजकीय तणाव, व्यापार वाद आणि कोविड-१९ लॉकडाऊन यासारख्या समस्यांमुळे, कंपनीला असे वाटले की एकाच क्षेत्रावर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही. या बाबतीत, भारत ॲपलसाठी कमी जोखीम असलेला पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे.


भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक आहे. स्थानिक उत्पादनामुळे ॲपलला ही मागणी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास मदत होते, तसेच त्याचा बाजारातील वाटा वाढतो, जो सध्या सुमारे ६-७% आहे. त्याचप्रमाणे भारताच्या मेक इन इंडिया उपक्रम आणि उत्पादन संलग्न उपक्रम (PLI) योजना स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतात. या धोरणांमुळे फॉक्सकॉन आणि टाटा सारख्या ॲपलच्या भागीदारांना भारतात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

Comments
Add Comment