
सफाईच्या कामाचे तीन तेरा वाजल्याने उद्दिष्ट गाठण्याबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई :मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यातील गाळाची सफाई तसेच मिठी नदीच्या सफाईच्या कामाला मागील एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत ही सफाई केवळ ६५.४५ टक्के एवढीच झाली आहे.
यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे नालेसफाईच्या कामाचे तीन तेरा वाजले गेले आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आल्यानंतर तो गाळ नाल्याच्या शेजारी सुकवण्यासाठी ठेवला जातो. काढलेला गाळ आणि नाल्यातील न काढलेला गाळही या पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने प्रशासनाला गाळ सफाईचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही.
छोट्या व मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या सर्व नाल्यांमधील गाळाची सफाई ही ६५.४५ टक्के झालेली आहे.
पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्या दरम्यान १० टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के अशाप्रकारे नाल्यातील गाळ काढणे अपेक्षित असते. या सर्व नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ९,६१,६८० मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित होते.
- मुंबईतील एकूण नालेसफाई : ६५.४५ टक्के
- काढण्यात येणारा अपेक्षित गाळ : ९,६१,६८० मेट्रीक टन
- काढण्यात आलेला आतापर्यंतचा गाळ : ६,२९,३९३
- पश्चिम उपनगरातील नालेसफाई : ८७.७२ टक्के
- मिठी नदीतील सफाई : ४९.९२ टक्के
- छोट्या नाल्यातील सफाई : ५५.२८ टक्के
- शहरातील नालेसफाई : ७०.२२ टक्के
- पूर्व उपनगरातील नालेसफाई : ८६.२१ टक्के