
नागपूर : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी असावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितच आग्रही होते. त्यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. तथापि मी भाजपाचा मंत्री नसून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून झालेलो मंत्री आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे नवनियुक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर छगन भुजबळ हे प्रथमच नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.
भुजबळ म्हणाले, की राज्यात जेव्हा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला, त्यावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला मंत्री करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय मला मंत्री करण्याचा नव्हता. त्यामुळे मी त्यावेळेला मंत्री होऊ शकलो नाही. या वेळेला मात्र दिल्लीतील आणि भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सहमती दर्शवली आणि त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा येऊ शकलो.
मुंडेंची जबाबदारी भुजबळांकडे
भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खाते जाहीर करण्यात आले आहे. अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.