Friday, May 23, 2025

नाशिक

भगूर रेल्वे बोगद्याखाली दुर्गंधीयुक्त पाणी

भगूर रेल्वे बोगद्याखाली दुर्गंधीयुक्त पाणी

सावरकर जन्मभूमी मार्ग समस्या दूर करा : दिनकर पवार यांची मागणी


दे.कॅम्प : भगूर येथील क्रांतीसुर्य भगूरपुत्र बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या रेल्वे बोगद्याच्या खाली कायमस्वरूपी साचणाऱ्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावा, असे आवाहन भाजप माजी सैनिक आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनकर पवार केली आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक ठिकाणी देशभरातून पर्यटक, सावरकरप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यातून ये-जा करावी लागते. त्या पाण्याच्या धुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा वास येत असून येणारे जाणारे शालेय विद्यार्थ्यांसह भगूरमध्ये रोज ये -जा करणारे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.


यापूर्वी अनेकदा नगरपरिषदेला स्थानिक नागरिकांनी अर्ज व निवेदन दिले; मात्र भगूर नगर परिषदेकडून कुठलीही दखल घेतलेली नाही. दिवस रात्र ज्येष्ठ नागरिक, महिलांसह शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात रेल्वे बोगद्याच्या खालून ये-जा करत असतात. घाण पाण्याची समस्या जैसे थेच असून पालिकेत गेली २० ते २५ वर्षापासूनचे सत्ताधारी समस्या दूर करण्याचे नाव काही घेत नाही. मग सत्ताधाऱ्यांनी टक्केवारीचीच कामे केली का, असा रोष स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. स्वा. सावरकर यांची बुधवार, दि २८ मे रोजी जयंती असून दिवसभर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भगूरच्या नगरपरिषद प्रशासनाला आता तरी जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


२८ मे रोजी सावरकर जयंती असून या भगूरने ५० स्वातंत्र्य सैनिक दिले आहेत. शहरातील मुख्य प्रवेशद्वार रेल्वे बोगदा पाच वर्षांपूर्वी झालेला आहे. मात्र, या रेल्वे बोगद्यात कायमस्वरूपी दुर्गंधी येत असून यातून पर्यटक येणार का? दुसरा भगूरमध्ये येणारा रस्ता अहुजा कॉम्प्लेक्समार्गे असून त्या रस्त्याचे काम चालू आहे. तसेच, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या थीम पार्क कामाचं काय? वर्ष उलटले मात्र कामास कुठलीही सुरवात झालेली नाही. ४० कोटी निधी मंजूर करून त्यापैकी १५ कोटींचा भगूरला निधी आला. मात्र जातो कुठे? रेल्वे बोगदा कायमस्वरूपी साफसफाई न झाल्यास माजी सैनिकांनाच पाऊल उचलावे लागेल.
- दिनकर पवार, माजी सुभेदार मेजर व माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष

Comments
Add Comment