Thursday, May 22, 2025

अग्रलेख

हुंडाबळीचा पुण्यात लांच्छनास्पद बळी

हुंडाबळीचा पुण्यात लांच्छनास्पद बळी

एकेकाळी विद्येचे माहेरघर अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ख्याती असलेल्या पुणे शहराच्या नावालौकिकाला, गौरवशाली परंपरेला गेल्या काही काळापासून ओहोटी लागलेली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींचे बालपण या पुणे शहरामध्ये गेले आहे. महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या कार्याची मुहूर्तमेढ व उभी हयात या पुणे शहरामध्ये गेली. शिवछत्रपतींनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, राणी ताराबाई यांच्यानंतर स्वराज्याची धुरा ज्या पेशव्यांनी सांभाळली, त्या पेशव्यांनी स्वराज्याचा कारभार याच पुण्यातील शनिवार वाड्यातून चालविला आहे. प्लेगसारख्या जीवघेण्या आजाराचा सामनाही याच पुणे शहराने खंबीरपणे केला. पुणे शहराच्या सावलीतच हाकेच्या अंतरावरील देहू-आळंदीमध्ये जगतगुरू संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकरी सांप्रदायाची सेवा केली. अभंग, हरिपाठ रचिले, विचारांची भिंत चालविली, रेड्यामुखी वेद बोलविले. असा नावलौकिक या पुणे शहराचा आहे. पण आज कधी कोयता गँग तर कधी अपहरण, कधी गोळीबार, कधी खंडणी युद्ध, राजकीय हत्या, अपहरण, रुग्णालयीन कारभाराचे गैरव्यवहार, तर कधी कुबेरपुत्रांकडून घडलेले अपघात अशा विविध घटनांनी पुणे शहराचा नावलौकिक इतिहासजमा होत चालला असून या शहराच्या वैभवाला, सांस्कृतिक इतिहासाला काळिमा फासण्याच्या घटना मोठ्या संख्येने घडू लागल्या आहेत. आता काहीसे वातावरण निवळत चालले असताना प्रेमविवाह केलेल्या वैष्णवीच्या आत्महत्येने पुन्हा वातावरण ढवळून निघाले असून पुणे शहर पुन्हा एकवार चर्चेच्या प्रकाशझोतात आले आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवी हगवणेने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून स्वत:चे आयुष्य संपवले असे म्हटले जात आहे. पण तिची हत्या झाल्याचा दावा वैष्णवीच्या घरचे करत आहेत. हुंड्यापायी वैष्णवीचा जीव गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान वैष्णवीचा जाऊ मयूरीने हगवणे कुटुंबाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. मुळातच वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह होण्यापूर्वी काही वर्षे उभयतांचे एकमेकांवर प्रेम होते. सासरच्या छळामुळे वैष्णवीने आत्महत्या केली असल्याचा सुरुवातीच्या काळात अंदाज व्यक्त केला जात असला तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आता विविध घटकांकडून व्यक्त केला जावू लागल्याने हे प्रकरण काही वेगळेच निघण्याची शक्यता आहे.

हा प्रेमविवाह होता, परंतु हगवणे परिवाराची वाढती हाव व त्यातून वैष्णवीचा वाढत चाललेले छळ आणि या प्रेमविवाहाची अखेर आत्महत्येत झाली. वैष्णवी ही कस्पटे या सधन परिवारातील मुलगी होती. हुंड्यात मिळालेला निधी व त्यातून दोन कोटी रुपयांची मागणी, अन्य वस्तूंची मागणी पाहिल्यावर हा प्रेमविवाह नसून केवळ वैष्णवीच्या माहेरी असलेला पैसा लाटण्यासाठीच शशांक हगवणे याने प्रेमाच्या नावाखाली भुलविले असल्याचे, गळाला लावले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सधन घरातील वैष्णवीने जर वेळीच आई-वडिलांचे म्हणणे ऐकले असते तर तिला आज जीव गमवावा लागला नसता, असा सूर आता पुणेकरांकडून आळविला जावू लागला आहे. वैष्णवीच्या लग्नाला तिच्या घरातल्यांनी म्हणजेच कस्पटे कुटुंबाने विरोध दर्शवला होता. मात्र वैष्णवीला शशांकशीच लग्न करायचे होते. अखेर वैष्णवीच्या नातेवाइकांनी कस्पटे परिवाराची समजूत काढल्यावर वैष्णवीच्या वडिलांनी थाटामाटात विवाह लावून दिला. हुंड्यामध्ये ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी असे कस्पटे परिवाराने देऊनही हगवणे परिवाराचे समाधान झाले नाही. विवाहानंतर मात्र हगवणे कुटुंबाची हाव काही संपली नाही, उलट ती वाढतच गेली. विवाहाच्या वेळी १ लाख २० हजारांचे घड्याळ शशांकने मागून घेतले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी जमीन घ्यायची असल्याचे सांगत शशांकने कस्पटे परिवाराकडे दोन कोटींची मागणी केली होती. ते पैसे न मिळाल्याने वैष्णवीचा छळ वाढत गेला. सासरच्या मंडळींकडून वैष्णवीला बेदम मारहाण होत असे. वैष्णवी गर्भवती राहिल्यावर तिच्या चारित्र्यावरच संशय घेण्यात आला. वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. पण तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केल्याच्या अनेक जखमा देखील आढळून आल्या असल्याचे शवविच्छेजन अहवालामध्ये म्हटले आहे. वैष्णवीला हुंड्यावरून तिच्या सासरचे लोक त्रास देत होते, तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे असा वैष्णवीच्या वडिलांनी दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शशांक हगवणे (वैष्णवीचा पती), लता हगवणे (सासू) आणि करिष्मा हगवणे (नणंद) यांना अटक केली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत. वैष्णवीच्या नवऱ्याला हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्यूनर कार पोलिसांनी जप्त केली आहे. मुळात कस्पटे परिवाराने विवाहात इतका खर्च केल्याने, दागिने, महागडी गाडी व अन्य वस्तूंची भेट दिल्यानेच हगवणे परिवाराचा स्वार्थ वाढत गेला. कस्पटे परिवाराने साधेपणाने विवाह करत महागड्या भेटवस्तू नाकारल्या असत्या तर हगवणे परिवारानेही अपेक्षा व्यक्त केल्या नसत्या. अर्थांत या सर्व जर-तरच्या आहेत. आता त्याला अर्थ नाही. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात वैष्णवीच्या रूपाने हुंडाबळीची घटना घडली आहे. एकीकडे कस्पटे या धनाढ्य कुटुंबाला आपली मुलगी गमवावी लागली तर प्रेमविवाहाच्या अट्टहासापायी घरच्यांचे म्हणणे न जुमानता चुकीच्या घराची निवड केल्याची किंमत वैष्णवीला आपले जीवन संपवून मोजावी लागली आहे. हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हगवणे परिवाराला फटकारले आहे. संबंधितांच्या अटक करण्याचे निर्देश देऊन वैष्णवीच्या लहान मुलाला कस्पटे परिवाराच्या स्वाधीन करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या आहेत.


पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात हुंडा देण्याघेण्याच्या घटना घडतात, त्यातून हुंडाबळीच्या घटना जन्माला येतात, हे सर्वच घृणास्पद आहे. अशा गोष्टी पुणे शहराच्या नावलौकिकाला शोभनीय नाहीत. प्रेमविवाहाची अखेर स्मशानाच्या मार्गावर गेल्याने हळहळ व्यक्त केली जात असली तरी राजकारणात वावरणाऱ्यांनी पैसाच्या लोभापायी घरातील सुनेचा अमानुष छळ केला. घराबाहेर जनसेवेचा चेहरा घेऊन वावरणारी मंडळी पैशाच्या हव्यासापायी घरातील सुनेवर अत्याचार करत होते. या घटनेतून प्रेमविवाह करणाऱ्यांनीही बोध घेणे आवश्यक आहे. या घटनांना वेळीच आवर बसणे काळाची गरज आहे. आपण सधन असलो तरी मुलीला प्रेमापायी काय द्यावे, किती द्यावे यालाही बंधने घालणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment