
मुंबई(सुशील परब): आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद अशी लढत लखनऊमध्ये होणार आहे. या लढतीला विशेष असे महत्त्व नसण्याचे कारण म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ प्लेऑफमध्ये आधीच पोहोचलेला आहे. सनरायजर्स हैदराबाद प्लेऑफमधून बाहेर आहे, मात्र फक्त विजयासाठी दोन्ही संघ खेळणार आहेत. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विजयासाठी नक्कीच प्रयत्न करतील व गुण संख्या वाढवतील.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे १२ सामन्यांत १७ गुण झाले असून ते गुणतालिकेत २ नंबरवर आहेत. कर्णधार रजत पाटीदार, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा, टिम डेव्हीड, रोमारीओ शेफर्ड अशा फलंदाजांची साथ असून भुवनेश्वर कुमार, कृणाल पंडया, नुवान तुशारा, यश दयाल असे गोलंदाज संघात आहेत. तर उत्तम फलंदाजी करत विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात दिसत आहे. त्याने या सीझनमध्ये ११ डावात ७ अर्धशतके केली आहेत. तसेच विराट आज मोठी खेळी खेळून साई सुदर्शन, शुभमन गिलला ऑरेंज कॅप शर्यतीत मागे टाकेल का हे पाहणे देखील रंजक ठरेल.
त्याचप्रमाणे सनरायजर्स हैदराबाद या संघाची कामगिरी पाहता असे लक्षात येईल की, यंदा आयपीएलमध्ये ते चांगली खेळी खेळू शकले नसून सध्या ते ८ व्या स्थानावर आहेत. तसेच कर्णधार पॅट कमिन्स ही आपल्या संघासाठी काहीच करू शकला नाही. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रेड्डी असे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत, तर हर्षल पटेल, कमिन्दू मेडिस, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, पॅट कमिन्स असे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. मात्र या सीझनमध्ये त्यांची गोलंदाजी चांगली झाली नाही व त्याचा परिणाम संघावर झाला असून सनरायजर्स हैदरावाद शेवटून दुसऱ्या स्थानी पोहोचला. चला तर पाहुया आज कोण विजयी होते.