
लखनऊ: इंडियन प्रीमियर लीगच्या ६५ नंबरच्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यांना सनरायजर्स हैदराबादने ४२ धावांनी हरवले. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २३१ धावा केल्या होत्या. आरसीबीसमोर विजयासाठी २३२ धावांचे आव्हान होते. मात्र त्यांना हे आव्हान पेलवले नाही आणि आरसीबीला केवळ ९ बाद १८७ धावाच करता आल्या.
आरसीबीसाठी विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी चांगली सुरूवात करून दिली. फिल साल्टने ६२ धावा तर विराट कोहलीने ४३ धावांची खेळी केली. मात्र ही भागीदारी संघाला विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही. या दोघांना वगळता कर्णधार जितेश शर्माने २४ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने त्यांना लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना लखनऊच्या मैदानावर रंगला होता. हैदराबादने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २३१ धावा केल्या होत्या.
हैदराबादकडून इशान किशनने तुफानी खेळी केली. इशान किशनने ४८ बॉलमध्ये ९४ धावांची तुफानी खेळी केली. सनरायजर्स हैदराबादची सुरूवात तुफानी झाली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा ३४ धावा करून बाद झाला. तर हेडला भुवनेश्वर कुमारने बाद केले. अभिषेक-हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन आणि इशान किशनने डाव सांभाळला. यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. स्पिनर सुयश शर्माने क्लासेनला बाद करत ही भागीदारी तोडली. क्लासेनने दोन षटकार आणि तितक्याच चौकाराच्या मदतीने १२ बॉलवर २४ धावा केल्या.