
देवळा : तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे ते वार्शी रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले असून ,याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष केले असून ,यावर विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा खड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा येथील भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे यांनी दिला आहे.
तालुक्यातील पश्चिम पट्यातील अनेक गावांना जोडला जाणारा हा मार्ग असल्याने यावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा
लागतो.
तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पाईप लाईनसाठी रस्ता तोडल्याने प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून ,याकडे संबंधित विभाग डोळेझाक करत आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांचा विळखा व मोठं मोठे खड्डे यामुळे या रस्त्यावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडत असतात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून यॊग्य ती कारवाई कारवी व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा खड्यात वृक्षारोपण करण्यात येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा शेवटी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे यांनी दिला आहे.