
कोलकाता: पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडाच्या गोसाईवाडी परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १३ वर्षीय कृष्णेंदु दासने चोरीच्या खोट्या आरोपानंतर आत्महत्या केली. तो बकुलदा हायस्कूलमध्ये सातवीत शिकत होता. बुधवारी रात्री त्याने कीटकनाशक प्यायले आणि गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक दुकानदार शुभंकर दीक्षितने कृष्णेंदुवर तीन पॅकेट चिप्स चोरीचा आरोप केला होता. किशोरने स्पष्ट केले होते की ते पॅकेट्स त्याने रस्त्यावरून उचलले होते. त्याला वाटले की ही पाकिटे जमिनीवर पडली होती. यानंतर दुकानदाराने दुकानासमोर कान पकडून त्याला माफी मागण्यास लावले होते. यानंतर त्याच्या आईनेही सर्वांसमोर त्याला ओरडले होते.
कुटुंबाने आरोप केला आहे की एक सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. यात कृष्णेंदुने आत्महत्या करण्याआधी नोटबुकमध्ये लिहिले की, आई , मी कुरकुरे नाही चोरले. मला ते रस्त्यावर भेटले होते. मी चोरी नाही केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. दुकानदार शुभांकर दीक्षित नागरिक स्वयंसेवकही आहे आणि घटनेनंतर फरार आहे.