
स्थानिकांनी केक कापून साजरा केला वाढदिवस
माथेरान :जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी सन २१ मे १८५० मध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसवलेले जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. त्याकाळी हे वनराईने नटलेले ठिकाण डोंगरमाथ्यावर असल्याने त्यांनी माथ्यावरचे रान अर्थातच 'माथेरान' हे नाव उदयास आणले. तेव्हापासून ते आजतागायत अनेक चढउतार, इथले संघर्षमय जीवन जगणारे नागरिक त्याचबरोबर सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात माथेरानचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या सुंदर निसर्गाप्रमाणेच इथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेला भूमिपुत्र प्रामाणिक आहे.
माथेरानने १७५ वर्षात पदार्पण करताना स्थानिकांनी आनंदाने येथील श्रीराम चौकात केक कापून आपल्या गावाचा वाढदिवस साजरा केला अशाप्रकारे एखाद्या गावाचा वाढदिवस साजरा करण्याची बहुधा देशातील पहिलीच घटना असावी. याच गावातील ग्रामदैवत श्री पिसारनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने कुणालाही काही कमी पडत नसून माथेरान सह संपूर्ण तालुक्यातील वीस हजार पेक्षाही अधिक लोक केवळ याच स्थळावर आपला उदरनिर्वाह करताना दिसतात. अन्य स्थळांच्या तुलनेत हे ठिकाण आजही प्रगतीच्या आणि सार्वभौम विकासाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. या गावात अनेक सुपूत्र जन्माला आले. यामध्ये वीर हुतात्मा भाई कोतवाल यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर उच्चशिक्षित पदवीधर तरुण इथेच निर्माण झाले आहेत. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेले स्थानिक नागरिक शांत आणि संयमी स्वभावाचे असून येणाऱ्या पर्यटकांना अत्यंत प्रामाणिकपणे सेवा उपलब्ध करून देतात.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या याठिकाणी सद्यस्थितीत बाराही महिने पर्यटकांची रेलचेल सुरू असते तर आबालवृद्धांनाही इथला निसर्ग नेहमीच खुणावत असतो. प्रदूषणमुक्त अशीच ओळख असलेल्या या ठिकाणी गर्द वनराई आणि आकर्षक नजारे काही महत्वाच्या पॉईंट्सवरून न्याहाळता येतात. माथेरानने १७५ वर्षात पदार्पण केले असले तरी सुद्धा आजही हे ठिकाण तारुण्यात असल्याचा भास होतो. कारण उंचउंच वृक्षवल्ली टिकून आहे. त्यामुळेच इथे पावसाचे प्रमाण अधिक असते. पूर्वीचे आणि आताचे माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. तीन ते चार दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले सर्वच व्यवहार ठप्प असायचे, क्वचितच पर्यटक हजेरी लावत असत. परंतु मुंबई पुण्यात राहणारे पर्यटक कामाच्या तणावातून शरीराला आणि मनाला मोकळीक मिळावी यासाठी इथे दोन दिवस मुक्कामी आवर्जून येत आहेत.
पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास साठ पेक्षाही अधिक हॉटेल्स तर घरगुती लॉज सुध्दा उपलब्ध आहेत त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे होत असते. १९०७ साली सर आदमजी पिरभोय आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय या पितापुत्रांनी सुरू केलेली मिनिट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळेच ह्या गाडीच्या सफरीसाठी देश विदेशातील पर्यटक गाडीत बसून खोल डोंगरदर्या पाहण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. पर्यटन क्रांती घडवण्यासाठी, वाहतुकीची गहन समस्या मार्गी लावण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष केंद्रित केल्यास इथे निश्चितच कायापालट होऊ शकतो.