Friday, May 23, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

अहिल्यानगरमध्ये संभाव्य दुर्घटनेचा धोका! विद्युत तारांवर लटकलेला फ्लेक्स, प्रशासन दुर्लक्ष करतंय?

अहिल्यानगरमध्ये संभाव्य दुर्घटनेचा धोका! विद्युत तारांवर लटकलेला फ्लेक्स, प्रशासन दुर्लक्ष करतंय?

अहिल्यानगर: राज्यात गेल्या वर्षी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर राज्यभरात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्सविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो, याचा ताजा प्रत्यय काल अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाला.


पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात काल वादळी वाऱ्यामुळे एक मोठा फ्लेक्स तुटून थेट मुख्य वीज वाहक तारांवर अडकला. परिणामी, त्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सदर ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते, त्यामुळे कोणतीही चूक जीवघेणी ठरू शकते.



विजेच्या तारांवर लटकणारे फ्लेक्स, नागरिकांमध्ये तीव्र संताप


गेल्या १२ ते १४ तासांपासून हा फ्लेक्स लटकत असून, महावितरण, महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही तत्काळ कारवाई झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, "मुंबईच्या घाटकोपर दुर्घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होईपर्यंत प्रशासन डोळेझाक करत राहणार का?". सदर प्रकारावर त्वरीत कारवाई करून फ्लेक्स हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Comments
Add Comment