
भालचंद्र ठोंबरे
भारतात पाकिस्तानतर्फे दहशतवादी कारवाया सतत चालू असतात. त्यामुळे भारताला पाक सीमेवर विशेषतः काश्मीर सीमेवर सतत सजग राहावे लागते. नुकत्याच पहलगाम हत्याकांडामुळे भारत व पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती व आता युद्धविराम झाला असला तरी अद्यापही ते सावट कायम आहे. अशातच बांगलादेश चीनच्या मदतीने लालमोनीरहट विमानतळ सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चेने भारत-बांगलादेश सीमेवरही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यातही सिलीगुडी कॅरीडोर ज्याला चिकनेक असेही म्हणतात याला चीनकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिलिगुडी कॅरीडोर
सिलिगुडी हे पश्चिम बंगालच्या उत्तर भागात हिमालयाच्या पायथ्याशी महानंदा नदीवरील असलेले एक शहर असून ते कलकत्त्यापासून पाचशेसाठ किलोमीटर अंतरावर आहे. सिलिगुडी कॅरीडोर हा पश्चिम बंगालचा बांगलादेश व नेपाळ दरम्यानचा चिंचोळा मार्ग असून हा भाग ६० किमी लांब व २२ किमी रुंद आहे. या मार्गाची सर्वात अरुंद भागाची रुंदी केवळ २२ किमी आहे. कॅरिडोरच्या उत्तरेला भूतान आहे. या कॅरीडोरने पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मीझोरम, नागालँड, त्रिपुरा भारताशी जोडलेले आहेत. म्हणून या मार्गाला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. येेथूनच जाणारा राजमार्ग व रेल्वे मार्ग पर्वोत्तर राज्यांना भारताशी जोडतो. या राज्यांशी दळणवळणाचा हाच एकमेव मार्ग आहे. हा संवेदनशील असल्याने याच्या रक्षणासाठी भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल, आसाम रायफलशिवाय पंजाब पोलिसांची ही गस्त असते. या मार्गाला पर्याय म्हणून म्यानमारमधून मार्ग तयार करण्याची योजना आहे. या प्रस्ताविक मार्गात कलकत्ता ते म्यानमारच्या सितवे बंदरापर्यंत समुद्र मार्गे पुढे कलादान नदीद्वारे जमिनीपर्यंत व तिथून पुढे मिझोरमपर्यंत जमीन मार्ग असा हा प्रस्तावित मार्ग असून याची अद्याप केवळ चर्चा असल्याचे समजते.
डोकलाम विवाद
चीनचे विस्तारवादी धोरण असल्याने चीनचे आपल्या शेजारी राष्ट्रांशी सीमेसंदर्भात सतत वाद सुरू असतात. डोकलाम वाद त्याच प्रकारचा असून येथील चीनची उपस्थितीही भारताच्या संवेदनशील चिकन नेकच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. डोकलांग हा भूतानचा चुंबी खोऱ्याच्या पठाराचा भाग आहे. २६९ किमी विस्तार असलेला हा भाग भारताच्या नथुला खिंडीपासून १५ किमी अंतरावर आहे. भारत, चीन व भूतान यांच्या सीमेवर हे ठिकाण असल्याने महत्त्वाचे आहे. मात्र चीन या भागावर आपला दावा सांगून कुरापती काढत असतो. १९६२ सालापासून या भागाबद्दल वाद सुरू आहे. १९८८ व ९८ मध्ये चीन व भूतान यांच्या दरम्यान या भागात शांतता प्रस्थापित ठेवण्यासंबंधी करार झाला. चीनची कुरापतखोर व विस्तारवादी वृत्ती पाहता २००७ मध्ये भूतानने भारतासोबत रक्षा व राष्ट्रीय हिताच्या संदर्भात परस्परांना सहकार्य करण्याचा करार केला. चीन व भूतानमधील शांतता करायला धडकवून चीनने २०१७ मध्ये डोकलांग सीमेनजीक रस्ते बांधणे व वस्त्या उभारण्याचे काम सुरू केले, त्याला भारताने विरोध करून ते काम बंद पाडले. ७२ दिवस चाललेल्या या संघर्षावर शेवटी चर्चेद्वारे तोडगा काढण्यात आला. मात्र या भागातील चीनची उपस्थिती व सैनिकी हालचाल भारताच्या चिकन नेक म्हणविणाऱ्या संवेदनशील भागाच्या सुरक्षितेच्या दृृ्ष्टीने धोकादायक आहे.
अरुणाचल प्रदेशाबद्दलही चीनच्या कुरापती
शिवाय अरुणाचल प्रदेशाबाबतही चीन नेहमीच कुरापती काढीत असतो. १९६२च्या युद्धात चिनने या प्रदेशावर आक्रमण करून तो जिंकल्याच्या दावा केला व नंतर प्रदेश सोडून मॅकमोहन लाईनपर्यंत मागे फिरला. परंतु तेव्हापासून चीन या प्रदेशावर सतत दावा ठोकत असतो. तसेच या अरुणाचल प्रदेशातील गावांची नद्यांची, डोंगरांची नावे बदलण्याचा एकतर्फा उद्योगही सुरू असतो. भारताने वेळोवेळी या सर्व गोष्टीला तीव्र विरोध केला आहे.
चीनच्या मदतीने विमानतळाचे पुनरुज्जीवन
आता बांगलादेशचा चीनच्या मदतीने बांगलादेशातील सहा विमानतळ पुनर्जीवित करण्याचा मानस आहे. यात ईश्वर्धी, ठाकूरगाव, समशेरनगर, बोगरा, कोमिल्लासोबत लालमोनीरहाट विमानतळ सुरू करण्याचा बांगलादेशचा मानस आहे. यासाठी चीनशी बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे.
लालमोनीरहाट
हजार एकराच्यावर विस्तार असलेला बांगलादेशमधील हा विमानतळ इंग्रजांनी १९३१ मध्ये निर्माण केला होता. दुसऱ्या महायुद्धातही हे मित्र राष्ट्रांच्या फौजेसाठी एक महत्त्वाचे विमानतळ होते. भारत-पाकच्या विभाजनानंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील हे विमानतळ काही वर्षे नागरी सेवेसाठी उपयोगात होते व त्यानंतर हे बंद करण्यात आले. हे विमानतळ भारताच्या सिलीगुडीपासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे, तर भारताच्याच मेघालय राज्याच्या सीमेपासून केवळ अंदाजे १५ किलोमीटरवर आहे. अन्य पाच विमानतळांसह याही विमानतळाच्या पुनर्जिवनाचा बांगलादेशचा विचार आहे व त्यासाठी बांगलादेशने चीन पुढे प्रस्ताव ठेवल्याची
चर्चा आहे.
बांगलादेशचे चीनला आमंत्रण
एक महिन्यापूर्वीच बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांनी चीनला भेट दिली व त्या भेटीदरम्यान त्यांनी चीनला बांगलादेशात आर्थिक विकासाच्या विस्ताराचे आमंत्रण दिले. त्यात मुख्यत्वे भारताच्या बांगलादेशच्या सीमेलगत असलेल्या सिलिगुडी या भाग जवळील भागाचा आर्थिक विस्तारासाठी समावेष आहे. यावेळी त्यांनी भारताच्या पूर्वोत्तर भागाबद्दलही वादग्रस्त विधाने केली आहेत.
भारतासाठी डोकेदुखी
चीनने स्वतःच्या सीमावर्ती भागात बहुसंख्य ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून संभाव्य युद्धकालीन परिस्थितीत जलद वाहतुकीच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. चीनची कुरापती वृत्ती पाहता भारत- चीन सीमेवर युद्धजन्य परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते. अशा वेळेस भारताच्या सीमेवर बांगलादेशात चीनने तळ निर्माण करणे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परवडणारे नाही. प्रथम डोकलाम नंतर अरुणाचल प्रदेशाबद्दल कुरापती काढत असताना, आता बांगलादेशच्या आमंत्रणानुसार चीनने भारताच्या भागातील चिकननेक जवळील बांगलादेशच्या सिमेलगतेच्या भागात कोणत्याही स्वरूपात आपले अस्तित्व निर्माण केले, तर तेथून चीन भारताच्या हालचालीवर नजर ठेवू शकतो व त्यामुळे भारताच्या चिकन नेकवतर संभाव्य संकटाचे सावट गडद होत आहे व ही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.