
छोंझिन अंगमोची कमाल, दिसत नसताना सर केला माउंट एव्हरेट
हिमाचल प्रदेश: ध्येयवेड्या व्यक्तीला आपले ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही अडचणी किंवा बंधने रोखू शकत नाही. अथक परिश्रमाच्या बळावर या व्यक्ती समाजासमोर आदर्श निर्माण करतात. यावर आधारित 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कवी कुसुमाग्रजांची कविता मराठीत प्रचलित आहे. तर अशा अनेक ध्येयवेड्या व्यक्तींची असामान्य कामगिरी आपण ऐकली आणि पाहिली असेल. तर त्यात आता हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात राहणाऱ्या एक अंध आदिवासी महिलेचा देखील समावेश झाला आहे. या महिलेचे नाव छोंझिन अंगमो (Chhonzin Angmo) असे असून, माऊंट एव्हरेस्ट करणाऱ्या या महिलेने तिच्या ध्येयाच्या मार्गात तिच्या दृष्टीदोषाला अडथळा येऊ दिला नाही. कारण, जगातील सर्वात उंच पर्वत सर करत भारताचा तिरंगा फडकवणारी अंगमो पहिली दृष्टिहीन भारतीय महिला ठरली आहे. (First Visually Impaired Woman to Summit Mount Everest)
माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दृष्टिहीन महिला आणि जगातील पाचवी व्यक्ती
अंगमोने जे करून दाखवले आहे ते इतर सामान्य व्यक्तीला करणे देखील खूपच कठीण आहे. तिने , सोमवारी जगातील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकवत माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि जगातील पाचवी व्यक्ती बनून इतिहास रचला आहे.
वयाच्या आठव्या वर्षी दृष्टी गेली
भारत-तिबेट सीमेवरील दुर्गम चांगो गावात जन्मलेल्या अंगमोची वयाच्या आठ वर्षांची असताना दृष्टी गेली. तरीही तिने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. सध्या ती दिल्लीतील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहक सेवा सहयोगी म्हणून काम करते. अंगमोचे वडील अमर चंद यांनी आपल्या मुलीने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना म्हंटले, "मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो आहे आणि तिच्या कामगिरीबद्दल आम्ही सर्वजण खूपच आनंदी आहोत. मात्र, आम्हाला अद्याप त्याचा अचूक तपशील माहित नसल्यामुळे आम्ही तिच्या परत येण्याची वाट पाहत आहोत." अंगमोने जगातील सर्वात उंच शिखर सर केल्याच्या बातमीने तिच्या गावातील स्थानिकांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.
एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी अंगमोने पीटीआयला सांगितले होते की, "माझी कहाणी आताच सुरू झाली आहे, माझे अंधत्व ही माझी कमजोरी नाही तर माझी ताकद आहे. पर्वत शिखरे चढणे हे माझे बालपणीचे स्वप्न होते पण आर्थिक अडचणी हे एक मोठे आव्हान होते. मात्र, आता मी सर्व शिखरे सर करणार आहे," असे ती म्हणाली होती.