Friday, May 23, 2025

कोकण

देवगडमध्ये मासेमारीला ‘ब्रेक’

देवगडमध्ये मासेमारीला ‘ब्रेक’

खोल समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांना आवाहन


देवगड : मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागाला चांगलेच झोडपल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात असलेली मासेमारी सध्या थंडावली आहे. पावसामुळे येथील बंदरात मच्छीमारी नौका थांबून होत्या. पावसामुळे खाडीकिनारच्या रस्त्यावर तसेच परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही कसरत करीत आपली वाहने हाकावी लागत होती. दरम्यान, मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागात जोर धरल्याने समुद्रात वेगाने हालचाली सुरू आहेत. किनारी भागात वादळसदृश स्थिती निर्माण होण्याच्या तसेच समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे मच्छीमारी नौका येथील बंदरात थांबून होत्या. त्यामुळे स्थानिक मच्छीमारी थंडावली आहे.


विशेषत: छोट्या मच्छीमारांना याचा अधिक त्रास जाणवतो. वाऱ्यामुळे छोटे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळतात. तसेच समुद्रातील बदलते वातावरण असल्याने ट्रॉलर घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळले जात आहे. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे किनारी भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. खाडीकिनारी भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकांनाही त्याचा त्रास जाणवत आहे. खाडीकिनारी सध्या मच्छीमारांची धांदल सुरू आहे.

Comments
Add Comment