
कोलकाता : आयपीएल स्पर्धेचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीसाठी चारही संघ निश्चित झाले आहेत. मात्र कुठला संघ कुणाविरोधात खेळणार याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आयपीएल प्लेऑफ आणि अंतिम फेरीतील सामन्याच्या आयोजनाबाबत संघर्ष सुरु आहे.आधीच्या नियोजनात अंतिम सामना कोलकाता येथे होणार होता. तेथून हा सामना हलवण्यात आला आहे. यावरून पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर आरोप केले आहेत.
२२ मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या चालू हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता. पण भारत-पाकिस्तान संघर्षामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा थांबवली होती. त्यानंतर जेव्हा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा वेळापत्रक बदलावे लागले आणि या बदलाचा एक भाग म्हणून भारतीय बोर्डाने प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांची ठिकाणे देखील बदलली. नवीन वेळापत्रकानुसार, मुल्लानपूरमध्ये दोन प्लेऑफ सामने खेळवले जातील आणि अंतिम सामन्यासह दोन सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जातील, असे सांगितले जात आहे.
बीसीसीआयच्या निर्णयानंतर बंगाल क्रिकेट आणि तेथील सरकार संतापले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशन या निर्णयावर सतत प्रश्न उपस्थित करत आहे. कोलकात्यातील चाहत्यांनीही त्याविरुद्ध रॅली काढली. आता या प्रकरणात बंगाल सरकारमधील क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी बीसीसीआय आणि भाजपवर राजकारण करण्याचा आरोप केला आहे. बिस्वास यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषद घेतली आणि बीसीसीआयवर स्थानिक क्रिकेट चाहत्यांकडून अंतिम सामना पाहण्याची संधी हिरावून घेतल्याचा आरोप केला.
यावर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोलकातामध्ये पावसाचा अंदाज असल्याने बीसीसीआय आणि आयपीएल अधिकाऱ्यांनी प्लेऑफ सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात होते. पण हे कारण क्रीडामंत्री बिस्वास यांना पटलेले नाही. त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की बीसीसीआय देखील हवामान तज्ज्ञ बनला आहे का? ते म्हणाले, "१ ते ४ जून दरम्यानच्या हवामानाचा अचूक अंदाज २६ मे नंतरच उपलब्ध होईल. याचा अर्थ त्या तारखांना अद्याप हवामानाचा इशारा देण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट बोर्ड हवामान तज्ज्ञ कसे बनू शकते?" असा सवालही त्यांनी केला.