
"पॅगोडा" राळेगणसिद्धीच्या डोंगर माथ्यावरील मनःशांतीचे स्थान
पारनेर :राळेगणसिद्धी हे केवळ ग्रामविकासाचं आदर्श उदाहरणच नसून, इथलं निसर्गसंपन्न सौंदर्य आणि सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवणारं गावही आहे. अशाच एका रम्य डोंगरमाथ्यावर वन विभागाच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने निर्माण झालेलं ‘पॅगोडा’ हे ठिकाण आज राळेगणसिद्धीतील एक महत्त्वाचं आकर्षण ठरलं आहे.
पॅगोडा म्हणजे शांततेचा,आत्मचिंतनाचा आणि निसर्गसान्निध्याचा अनुभव देणारं एक सुंदर ठिकाण.डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा परिसर सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांनी नेहमीच गजबजलेला असतो. सकाळच्या मंद झुळुकीत,थोड्या थंड हवेत व व्यायामात व्यस्त असलेल्या तरुणांना व्यायाम करताना पाहतानाचं दृश्यच प्रेरणादायी ठरतं.संध्याकाळच्या वेळेस आम्ही सर्व मित्र मंडळी याच ठिकाणी एकत्र येतो. गप्पा आणि विविध अनुभवांची देवाण-घेवाण हे सगळं पॅगोड्याच्या डोंगर माथ्यावरील परिसरात एका अविस्मरणीय क्षणात परिवर्तित होतं.
विशेषतः कोरोना काळात तर पॅगोडाचं महत्त्व आम्हां मित्रांसाठी अधिकच वाढलं होतं. त्या काळात आम्ही दररोज याच परिसरात एकत्र जमून तासनतास गप्पा मारायचो. एकमेकांच्या आधाराने त्या कठीण काळातून मार्ग काढायचो. काही वेळा याच ठिकाणी गाण्याच्या मैफिलीही रंगल्या. संगीत, मैत्री आणि निसर्ग यांचा मिलाफ तिथं अनुभवायला मिळतो.पॅगोडा हे ठिकाण ऋतूंनुसार आपलं वेगळं रूप दाखवतं. उन्हाळ्यात गार वाऱ्याची थोडीशी झुळूकसुद्धा मनाला शांती देते, तर पावसात हिरवळ आणि धुक्यात हरवलेली वाट हीच स्वर्गसमान भासते. कोणताही ऋतू असो,हे ठिकाण मनाला नेहमीच आल्हाददायक अनुभव देणारं आहे