
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाले. नंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या भोंगळ कारभाराच्या अनेक बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. याआधी सरपंच हत्येप्रकरणी काही पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर काही काळ बीडमध्ये पोलीस दलात काही बदल झाले नव्हते. पण आता एकदम मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बीड पोलीस दलातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरच्या ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिन्याभरात बदल्यांच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण होईल. सर्व अधिकारी - कर्मचारी नव्या जबाबदारीवर नियुक्त होतील. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली होती.