
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे काम ५१ टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे.
यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली. आता प्रामुख्याने मोठी यंत्रे जाऊ शकत नाही.अशा छोटे नाल्यांचा सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई झालेली आहे.
दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत. तेथे आता नालेसफाईचे काम सुरू झाले आहे. नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. नाल्यांतून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलविण्यात यावा,असे निर्देश या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत.
नियोजित वेळेत नालेसफाईची कामे पूर्ण होतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तेथे येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.