
६५३ गाव-वाड्यातील तीन लाख नाशिककर पाण्यासाठी व्याकुळ
नाशिक :मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही टंचाईची तीव्रता कायम आहे. सद्यस्थितीत १२ तालुक्यातील ६५३ गाव-वाड्यांना १७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या वळिवाच्या पावसाने जणू पावसाळा सुरू झाल्याची स्थिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांना तलावाचे स्वरुप प्राप्त होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चटके काहिसे कमी होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. सध्या १७९ गावे आणि ४७४ वाड्या अशा एकूण ६५३ ठिकाणी टँकरने पाणी द्यावे लागत असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.
पाणी टंचाईची सर्वाधिक झळ नांदगाव तालुक्यास (१५३ गाव-वाडी) बसली. त्याखालोखाल येवला (१२५), सिन्नर (१००), इगतपुरी (७५), मालेगाव (५४), चांदवड (४२), पेठ(३०), त्र्यंबकेश्वर (२५), सुरगाणा(२३), देवळा (१२), कळवण (आठ), बागलाण तालुक्यात (सहा) गाव-वाड्यांचा समावेश आहे.
नाशिक, निफाड, दिंडोरी तालुके टँकरमुक्त
१२ तालुक्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईची झळ बसत असताना नाशिक, निफाड आणि दिंडोरी हे तीन तालुके मात्र संपूर्ण उन्हाळ्यात टँकरमुक्त राहिले आहेत. या भागातील एखाद्या गावाची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्याची वेळ आलेली नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात ७७ खासगी विहिरी अधिग्रहित
गावांची तहान भागविण्यासह टँकरसाठी जिल्ह्यात ७७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात गावांसाठी १७, तर टँकरसाठी ६० विहिरींचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १७, इगतपुरी १६, पेठ आठ, सुरगाणा सहा, बागलाण आणि येवल्यात प्रत्येकी तीन, चांदवड, देवळा, मालेगाव कळवण तालुक्यात प्रत्येकी दोन, सिन्नरमधील एका विहिरीचा समावेश आहे.