
जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
आज अध्यात्माच्या विरोधात काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. देव नाहीच असे म्हणतात. कारण यांना सद्गुरुंचे मार्गदर्शन नसते आणि हे म्हणतात आम्हांला गुरूच नको. सद्गुरू आम्ही करणारच नाही. आमचे आम्ही मुख्यत्यार आहोत. देव म्हणजे काय खेळणे आहे का? जगांत काय चालले आहे ते मार्गदर्शकाशिवाय कसे कळणार? आमच्या भीमसेन जोशींनीसुद्धा गाण्यासाठी किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या किती ठिकाणी फिरावे लागले व फिरता फिरता चांगले गुरू मिळाले ते त्यांच्या शेजारीच. चांगले गुरू त्यांना त्यांच्या शेजारीच मिळाले. कोण? सवाई गंधर्व हे त्यांचे गुरू व ते त्यांच्या शेजारीच होते पण भीमसेन जोशी कुठे कुठे फिरले. तसे आपले झालेले आहे. आपण देवाला शोध शोध शोधतो व तो असतो आपल्याजवळ. सांगायचा मुद्दा असा भीमसेन जोशींना गाण्यासाठी मार्गदर्शन मिळाले तरी त्यांना कितीतरी कष्ट करावे लागले मग अध्यात्मात काय? पण लोकांना समजत नाही त्याला काय करणार?
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मार्गदर्शकाचे म्हणजेच गुरुचे स्थान वादातीत आहे. परमार्थाच्या क्षेत्रात तर सद्गुरुंचे महत्त्व अपरंपार आहे. स्थूल स्वरूपाच्या विद्या व कला गुरूशिवाय आकळता येत नाहीत मग अध्यात्मविद्येसारखी सूक्ष्मविद्या सद्गुरूंशिवाय आत्मसात करता येणे शक्य आहे का? अध्यात्म विद्येचे स्वरूपच न समजल्यामुळे हा सर्व घोटाळा निर्माण झालेला आहे. अध्यात्मशास्त्र शिकायचे म्हणजे आपल्या जीवनातील फार मोठे गुह्य आकलणे होय. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की, या सत्याची जाणीव परमार्थात पडलेल्या बहुसंख्य लोकांना नसते. खरे सद्गुरू भेटतात तेव्हाच या सत्याची जाणीव साधकाला होते व ते सद्गुरूच साधकाला जीवनातील मोठे गुह्य समजावून देऊन त्या महान गुह्याची उकल कशी करून घ्यायची त्याचा स्पष्ट मार्ग दाखवितात. म्हणून सद्गुरुशिवाय तरणोपाय नाही असे सर्व संत सांगतात ते स्वीकारायचे की नाकारायचे हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.