Wednesday, May 21, 2025

अध्यात्म

जाणिले ज्याने आयुष्याचे मर्म

जाणिले ज्याने आयुष्याचे मर्म

मनाचा गाभारा : अर्चना सरोदेया


क्षणभंगुर आयुष्य म्हणजे,
जणू अळवावरचे पाणी!!
क्षणांत भासे मोत्यसम,
अन् क्षणात जाई उडोनि !!


या माझ्या कवितेतील काही ओळी. सद्यपरिस्थितीत जर या ओळींचा विचार केला तर दिसून येतं की खरंच किती क्षणभंगुर आहे हा आयुष्याचा प्रवास. तरीही आपण याचे गांभीर्य लक्षात घेत नाही. फुलाला माहीत असतं आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे पण तरीही ते आपला सुगंध दरवळायला विसरत नाही. फुलपाखराला माहीत असतं त्याच्या अल्प आयुष्याबद्दल पण ते या झाडावरून त्या झाडावर आनंदाने बागडायचे सोडत नाही. परंतु मनुष्य असा प्राणी आहे की, ज्याला माहिती आहे हे आयुष्य क्षणभंगुर आहे...


आताचा हा क्षण आपला आहे पण पुढच्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही... तरीही भुतकाळ आणि भविष्यकाळ यातच तो आपला वेळ वाया घालवतो आणि वर्तमान त्याच्या हातून वाळूप्रमाणे निसटून जातो... जेव्हा मृत्यू समोर उभा ठाकतो त्यावेळी गतायुष्याकडे वळून पाहताना तो सुख दुःखांची वजाबाकी मांडतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की बाकी फक्त शून्य उरली आहे... भौतिक सुखाच्या मागे धावून आजचा क्षण जगण्याचे तर राहूनच गेले..‌. खरंतर आपण अनेकदा भुतकाळातील दु:ख आणि भविष्यातील चिंता यामुळे आपला वर्तमान बिघडवून टाकतो... भुतकाळात आपल्या हातून ज्या चुका घडून गेल्या त्या सुधारून किंवा त्यातून शिकून आपण आपले भविष्याचे नियोजन किंवा आखणी केली पाहिजे तेव्हाच वर्तमान सुखकर होईल. कधीकधी प्रश्न पडतो की, आयुष्य जर क्षणभंगुर आहे तर आपल्या मनात आपण का एवढा अहंकार, क्रोध, स्वार्थ, द्वेश यांना थारा देतो... क्रोध, द्वेश, वैरभावना या माणसाला नकारात्मक ऊर्जा देतात. क्रोधामुळे मतभेद होतात. जे दुसऱ्यालाच नाही तर स्वतःलाही त्रास देतात. त्यातून जीवनात अशांती निर्माण होते.


जी आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला दूर ठेवते. अहंकार हा माणसातल्या सकारात्मक ऊर्जेचा नाश करतो. अहंकारामुळे माणूस समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखतो तो कधीच दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही. अहंकार ही अशी भावना आहे जी माणसाला सत्यापासून दूर ठेवते... वास्तवाची जाणीव होऊच देत नाही... आणि वास्तव हे आहे की आपलं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत चालले आहे... आपण रिकाम्या हाताने जन्माला आलो रिकाम्या हाताने जाणार...


हेच शाश्वत सत्य आहे. या जगातील आपला प्रवास म्हणजे चौंऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्या नंतरची घेतलेली विश्रांती. ही विश्रांती घेतल्यावर तुमचा प्रवास पुन्हा सुरू करायचा की मोक्षाचे तिकीट मिळवून वैकुंठी प्रभू चरणी लिन व्हायचे हे तुमची कर्मच ठरवत असतात. इथे मला महाभारतातील एक गोष्ट आठवते. जेव्हा पांडव स्वर्गात सदेह जाण्यासाठी प्रवास सुरू करतात तेव्हा त्यांच्या बरोबर एक काळा कुत्रा येतो. अर्जुन त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करतो परंतु तो जात नाही तेव्हा धर्मराज युधिष्ठिर त्याला सोबत घेतो. सर्वप्रथम पांचालीला यमराज घेऊन जातो. युधिष्ठिरला सगळे त्याचं कारण विचारतात की आपल्या आधी ती का गेली. तेव्हा युधिष्ठिर सांगतो आपल्याला षडरिपूंचा त्याग करुन स्वर्गात जायचे होते; परंतु पांचाली मत्सर त्यागू नाही शकली. दुसरा क्रमांक नकुलचा आला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला नकूलला मोहाचा त्याग नाही करता आला. तिसरा क्रमांक सहदेवचा आला, युधिष्ठिर म्हणाला “ सहदेवला लोभाचा त्याग करता नाही आला”... चौथा क्रमांक अर्जुनाचा आला, युधिष्ठिर म्हणाला “अर्जुनाला आपण सर्व श्रेष्ठ धनुर्धर असल्याचा अहंकार होता”... जेव्हा भिमाचा क्रमांक आला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला “भिमा तुला क्रोध त्यागता नाही आला”... अशा प्रकारे युधिष्ठिर फक्त एकटा सदेह स्वर्गात गेला परंतु त्याच्या पायाचा एक अंगठा मात्र गळून पडला. सोबत असलेला कुत्रा हा दुसरा तिसरा कोणी नसून यमराज होता. युधिष्ठिरने यमराजाला पायाचा अंगठा गळून का पडला यांचे कारण विचारले असता यमराज म्हणाले “तु युद्धात द्रोणाचार्यांच्या वधाच्या वेळी” नरो वा कुंजरो वा” हे अर्ध सत्य बोललास म्हणून तुझा फक्त अंगठा गळून पडला”...


तात्पर्य काय तर आपल्याला मोक्ष मिळणार की पुन्हा चौंऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यांमध्ये अडकायचे हे आपण केलेल्या कर्मांवर अवलंबून असते. जीवन जगण्यासाठी संपत्ती, मान सन्मान, पैसा असणे जरी गरजेचे असले तरी चांगली कर्मे, प्रेमळ स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन आणि समाधान या गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच खरा श्रीमंत. जोवर आपण इथे आहोत तोवर प्रेम, करुणा, सदाचार वृत्ती, सद्भावना यांचे बीज रोवल्यास त्या वृक्षाला आपला इथला प्रवास संपल्यावर देखील आपल्या चांगल्या कर्माची फळे लागतील हे निश्चित. शेवटी हे मातीचेच शरीर आहे, मातीतच मिळणार आहे. संत कबिरांचा खूप छान दोहा आहे...


माटी कहे कुम्हार से तु क्या रौंदें मोहें ।
इक दिन ऐसा आवेगा मैं रौंदुंगी तोहे ।
अर्थ : माती कुंभाराला म्हणते “अरे कुंभारा ! आज मडके घडविण्यासाठी तु मला पायाखाली घेऊन मळतो आहेस पण लक्षात ठेव एक दिवस असा येईल तुझे जीवन संपल्यावर मी तुला पायाखाली घेईन!” आणि हेच शाश्वत सत्य आहे.
समर्थ रामदास स्वामी दासबोधात
म्हणतात की,
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी|
मना सज्जना हेचि क्रीया धरावी||
मना चंदनाचे परी त्वा झिजावे|
परी अंतरी सज्जना नीववावे ||
रे मना ! आपण जीवन भर अशी क्रिया करावी की आपल्या देहत्यागानंतर सुद्धा लोकांनी आपली किर्ती गायला हवी.
रे मना ! आपण लोक कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजावे जेणेकरून आपल्याला आपल्या आचरणातून शितलता आणि शालिनतेने सज्जनांना प्रसन्न करता येईल.
तेव्हा आयुष्याचे हे मर्म जाणून या आयुष्याच्या प्रवासात प्रेम, सकारात्मकता, माणुसकी, सद्भावना, यांना सोबत घेऊन आपला प्रवास सुरू ठेवूया. ज्यामुळे आपल्या जीवनाला एक अर्थ आणि दिशा मिळेल आणि आपले जीवनही चंदनाप्रमाणे शितल आणि सुगंधित होईल !

Comments
Add Comment