
पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २४ वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राजेंद्र हगवणे यांची सून होती. राजेंद्र हगवणे यांचे राजकीय वर्तुळात लागेबांधे असल्यामुळे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि साडेसात किलो वजनाची चांदीची भांडी दिली होती. नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी पैशांसाठी सतत वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. वैष्णवीला मारहाण केली.
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी २०२३ मध्ये गरोदर होती त्यावेळी शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. पैशांची मागणी तर हगवणे कुटुंब वारंवार करत होते. आम्हाला पैसे पाहिजे. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं ? असा सवाल शशांक हगवणे यांनी वैष्णवीच्या वडिलांना केला होता.
सासरच्यांकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्यानं वैष्णवीने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी विषारी औषध जेवणातून घेतलं. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली, आम्ही तिला एम्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. मात्र तिच्या सासरहून कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी तिथे आलं नाही.ती पूर्ण बरी झाल्यानंतर काही दिवस आमच्याच घरी होती. आम्ही तिला पुन्हा तिच्या सासरी घेऊन गेलो. मात्र तिचा छळ सुरूच होता. त्यानंतर साधारणपणे १५ दिवसानंतर माझे जावई शशांक हे माझ्या राहत्या घरी आले व त्यांनी माझ्याकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली, असं वैष्णवीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा हगवणे अटकेत आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांना चौकशी करुन कारवाईचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू आहे. राज्य महिला आयोगानं निर्देश दिल्यानंतर वैष्णवीच्या मुलाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे देण्यात आला.