धुळे : गुलमोहर शासकीय विश्रामगृहातून पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचा आरोप उद्धव गटाने केला आहे. कंत्राट देण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडूनच लाच घेण्यात आली. ही रक्कम एका आमदाराने पीएच्या हाती सोपवण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले होते. आमदाराच्या सांगण्यावरुन कंत्राटदार रोख रक्कम घेऊन आला. पण आयत्यावेळी पोलिसांनी धाड टाकून रक्कम जप्त केली. जप्त केलेली रक्कम एकूण ११ आमदारांमध्ये वाटण्याचे नियोजन होते असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. ज्या खोलीतून रक्कम जप्त झाली ती खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावावर नोंदवलेली होती, असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. उद्धव गटाचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी फेटाळला आहे. महाराष्ट्र शासन आणि राज्यातील आमदारांच्या समितीला बदनाम करण्यासाठी उद्धव गटानेच एक खेळी केल्याचा संशय आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या विधीमंडळाची अंदाज समिती तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात आहे. धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा ही समिती घेणार आहे. समितीत २९ आमदार आहेत. या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. खोतकरांसह समितीचे ११ आमदार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच आमदारांना लाच म्हणून देण्यासाठी पाच कोटींची रोकड गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा आरोप उद्धव गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. तर ठोस पुरावे नसताना फक्त आरोपांची राळ उडवून देणे ही माजी आमदार गोटेंची जुनी खोड असल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे.
विशेष म्हणजे उद्धव गटाच्या उपस्थितीत खोली क्रमांक १०२ ला कुलुप लावण्यात आले. पोलीस आल्यावर उद्धव गटाच्या उपस्थितीतच हे कुलुप काढून खोलीत तपासणी करण्यात आली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पाच कोटींची रोकड आल्याचा आरोप केला. पण खोलीतून पोलिसांनी एक कोटी ८४ लाख २०० रुपये एवढीच रोकड जप्त केली आहे. खोलीत एवढेच पैसे होते, असे पोलिसांनी सांगितले.