
मुंबई: मुंबईतील गटारे साफ करण्यासाठी महानगरपालिका नियमांनुसार मॅन्युअल सफाई करणे हे कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आणि त्यांचे पुनर्वसन कायदा, २०१३ या कायद्यानुसार, गटारे आणि सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी मानवी कामगारांना वापरणे हे बेकायदेशीर आहे. मात्र याकडे घाटकोपर येथील कर्मचारी अपवाद असावेत. पश्चिम भागात चक्क हे काम करताना कर्मचाऱ्यांना उघडेपणाने काम करावे लागत असल्याचे समोर आले होते. मात्र पालिका अधिकारी याबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील गोळीबार रोड येथील एल बी एस रोड लगत गटारे साफ करताना कर्मचारी उघडे आणि कोणतेही संरक्षणात्मक उपकरणे न वापरता सफाई करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिकेच्या नियमांचा एकीकडे बोजवारा उडाला असून, दुसरीकडे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सफाई कर्मचारी अनेकदा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यांना योग्य सुरक्षा उपकरणे मिळत नाहीत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही असा आरोप आता होत आहे अनेकदा त्याचा जीव मॅनहोल साफसफाई करताना धोक्यात येतात. त्यांना ज्या कंत्राटदाराने कामावर ठेवले आहे त्यांच्याकडून सुरक्षा उपकरणे दिली नाहीत असेही सांगण्यात येत आहे. या कामगारांना हातमोजे, मास्क, आणि गम बूट मिळत नाहीत. ज्यामुळे ते विषारी वायू आणि रोगांना बळी पडतात.त्यांना अनेकदा गरम आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागते. तरीही याची खंत कंत्राटदारांना नसते हे आता उघड होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांना नियमानुसार पालिकेकडून सुविधा मिळाव्यात अशी मागणी कामगार नेते रमेश जाधव यांनी केले आहे.
गटारातील कामे सध्या काही ठिकाणी कंत्राटदार करत असतात. त्यांना आम्ही कामगारांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र अनेकदा कामगार गटारात उतरले की बुटात पाणी जाते म्हणून बूट किंवा हातमोजे घालत नाहीत. मात्र तरीही आम्ही कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना गटारात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा उपाय म्हणून पावसाळी बूट, हातमोजे तसेच इतरही सुरक्षेचे साहित्य वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असे एन वार्डचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले.