
संतोष वायंगणकर संतोष वायंगणकर
एप्रिल-मे महिना म्हणजे कोकणात चाकरमान्यांची लगबग... मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जे बाहेर असतात असे सारे कोकणात आपल्या मूळ गावी येतात. या चाकरमान्यांच्या आगमनाने कोकणातील गावखेडी गजबजलेली असतात. कोकणातील बंद घरे चाकरमान्यांच्या वास्तव्याने महिनाभरासाठी उघडी दिसतात. तशी गावातील वाडी-वस्तीतही लोकांची ये-जा सुरू असते. एप्रिल-मे महिना लग्न सोहळे, गावातील ग्रामदेवतांचे वर्धापन दिन, गावचे उत्सव, कोकणातील ग्रामदेवतांच्या मंदिरातील महाप्रसाद असं सारं उत्सवी वातावरण असतं. कडक उन्हाळ्यातही ग्रामदेवतेच्या उत्सवात प्रत्येक गावकरी आपल्या कुटुंबासह सहभागी असतो. कडक उन्हाळा, काही गावातून जाणवणारी पाणीटंचाई असं सगळं वातावरण असलं तरीही कोकणवासीय मात्र आपला आनंद मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या विवाह सोहळ्यात, वास्तुशांतीच्या कार्यक्रमातून शोधत असतो. त्यात कोकण रमलेलं असतं. आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभुळ कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतास तयार असतात; परंतु यावर्षी आंबा, काजू यांच पीक कमी झालं. काजू ‘बी’ चा दर सर्वसाधारणपणे स्थिर राहिला; परंतु हवामानाच्या सततच्या परिणामाने पिकावर आणि उत्पादित झालेल्या काजू ‘बी’वर त्याचा परिणाम झाला.
काजू ‘बी’वर काळपट थर जमा झाला. साहजिकच काजू बागायतदार शेतकऱ्यांची मेहनत वाढली. काजू ‘बी’ साफसफाई केल्याशिवाय विक्रीला देता येणारी नव्हती. आंब्याची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. सुरुवातीला हापूस आंब्याचा दर चांगला होता; परंतु बदलत राहणारे हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे साहजिकच आंबा शेवटच्या टप्प्यात आंबा बागायतदार शेतकऱ्याच्या हातून निसटला. एकतर यावर्षी आंबा उत्पादनही फारच कमी प्रमाणात झाले. कोकणातील स्थानिक बाजारपेठातून कोकणातील हापूस आंबा गायब झाला आहे. कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्याकडे आंबाच नाही. त्यामुळे बाजारपेठामध्ये कोकणाबाहेरचा आंबा विक्रीला दिसत आहे. कोकणात भरणारा आठवडा बाजार आणि गावठी बाजारात कोकणातील झाडी आंबा येऊ लागला आहे. मात्र, कोकणात रायवळ आंब्याची जुनी झाडही गावातून दुर्मीळ होत आहेत. यामुळे कोकणात पूर्वी गोरगरीब कुटुंबांना मे महिन्यात आधार वाटणारा रायवळ आंबा दिसेनासा झाला आहे. पूर्वीची आंब्याची झाड जपली जात नाहीत आणि नव्याने कोणीही रायवळ आंब्याची लागवडही करत नाही. यामुळे साहजिकच कोकणच वैशिष्ट्यपूर्ण असलेला रायवळ आंबा अस्तित्वहीन होत चालला आहे.
कोकम हे कोकणच आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. कोकमची सोलकढी आज अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेतही मानाने जेवणाच्या ताटात मिरवताना दिसते. कोकमला यावर्षी दरही चांगला होता; परंतु कोकमच उत्पादनही कमी आहे. कोकमला मेहनत आहे. आता कोकणात इतकी मेहनत करून कोकणातील या कोकमच विविध प्रकार करण्यात पुरेस मनुष्यबळही उरलेले नाही. दुसरी गोष्ट कोकणात कोकम लागवड ज्याला फार कमी मेहनत असते. ती कोकम लागवड व्हायला हवी होती. परंतु ती लागवड म्हणावी त्या प्रमाणात झाली नाही. कोकम लागवड मोठ्या प्रमाणात कोकणात झाली असती तर त्याचा फायदाही कोकणातील शेतकऱ्याला होऊ शकला असता. परंतु यातही काही भागात मात्र शेतकऱ्यांनी कोकमची स्वतंत्र बागायत केल्याचे सकारात्मक दृश्यही पाहायला मिळतं. याचं प्रमाण फार कमी असलं तरीही कोकणातील काही मोजक्या शेतकऱ्यांनी प्रायोगिकतेत प्रयत्न तर केले आहेत. जांभुळ यावर्षीही कोकणच्या बाजारात फार कुठे दिसले नाही.
कोकणातील जांभुळ पुणे, मुंबईच्या बाजारात पाठवले जाते. त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे; परंतु जांभुळ लागवडीच्या बाबतीतही कोकणात उदासीनताच पाहायला मिळते. जांभुळ लागवड करून त्याचा बागायत म्हणून आजवर कोणी फारसा विचार केलेला नाही. दुसरी बाब जांभुळ, करवंद याबाबतीत कोकणकृषी विद्यापीठ आजही उदासीनच आहे. यामुळेच जांभुळ, करवंदांकडे कृषी विद्यापीठाने त्याकडे आपलं लक्ष वळवलेलं नाही. कोकणची काळी मैना म्हणून या करवंदांचा उल्लेख सर्वत्र होतो. कोकणातील ही करवंद डोंगर-दऱ्यांमध्ये असतात. रानात दिसणारी ही करवंद पूर्वी बाजारात विक्रीला यायची. कोकणात येणारा चाकरमानीही शेताच्या बांधावर काटेरी झुडपात होणारी करवंद सहकुटुंब या करवंदाचा आस्वाद घ्यायचा, चांदवड्याच्या पानाचा तयार केलेला खोला. त्यात आपण स्वत: करवंदांच्या झाळीवरून काढलेली करवंद ती खाण्यात एक वेगळीच मजा असते. हा आनंद ज्यांनी अनुभवला असेल निश्चितच नुसत्या कल्पनेनेही त्यांना ते जुने दिवस आठवल्यावाचून राहणार नाहीत. यावर्षी या अशा सर्व आनंदावर विरजणच पडले आहे.
कोकणात पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हा पाऊस एकच दिवस वाटला; परंतु तसे घडले नाही. तो रोज संध्याकाळी, सकाळीही पाऊस पडू लागला. यामुळे साहजिकच कोकणातील रानमेवा लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी रानातच राहिला. यामुळे जशी जांभुळ, करवंद लोकांना त्याची फारशी चव चाखायलाही मिळाली नाही. यामुळे यावर्षी अवकाळी पावसाने कोकणात उत्पादित होणाऱ्या सर्वच फळांच्या बाबतीत काहीशी अशीच स्थिती आहे. फणसाचं उत्पादन यावर्षी चांगलं झालंय. यामुळे कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील फणस विक्रीला असलेला दिसतो. कापे आणि रसाळ या दोन प्रकारात असणाऱ्या फणसांना दोन्ही प्रकारात फार मोठी मागणी आहे. मात्र, यातही कापा फणस बाजारात फार मोठ्या प्रमाणात विक्रीला असतो. याचं एक सहज आठवलेलं उदाहरणही सांगतो. सिंधुदुर्गात २००९ मध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सर्व मंत्रीगण उपस्थित होते. त्यावेळच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. तेव्हा अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री होते. त्यावेळच्या जेवणामध्ये स्वीट डीश म्हणून कापे गरे होते. अजितदादांनी कापे गऱ्याची तेव्हा खास फर्माइश केली. अगदी कापे गरे पॅकिंगमधूनच मागितले होते. त्यामुळे कोकणातील या काप्या गऱ्यांची स्वादिष्टताही वेगळीच आहे. कोकणातील हे सारं निसर्ग निर्मित फळ यावर्षी पावसाने मात्र त्याचा स्वाद तर बिघडलाच; परंतु लोकांपर्यंत येण्यापूर्वीच रानातच राहिला.