Thursday, May 22, 2025

रायगड

सुधागडात उन्हाळ्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद वाढला

सुधागडात उन्हाळ्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद वाढला

ताम्हिणी घाट सुधागड आदी ठिकाणी धबधबे वाहू लागले


सुधागड-पाली: मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी ताम्हिणी घाट, सुधागड व इतर डोंगराळ प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे वाहताना दिसत आहेत. या अवकाळी पावसामुळे येथील सृष्टी न्हाऊन निघाली. आकाशात काळ्या पांढऱ्या ढगांची जुगलबंदी व आकाशात काळे, पांढरे, राखाडी छटा असलेले ढग एकमेकांत गुंफलेले दिसतात. कुठे काळ्या ढगांच्या गर्दीत पांढऱ्या ढगांचे हलके फुलकीदार थर, तर कुठे काळ्या पांढऱ्या ढगांचे विलक्षण आकार लक्ष वेधत आहेत.


वळीवाचा पाऊस किंवा अवकाळी पाऊस आला असला तरी या पावसामुळे मुंग्या व वाळवी यासारखे प्राणी सक्रीय झालेत. तसेच सरडे, खेकडे, पाली व बेडूक हे देखील बाहेर पडतात. अवकाळी पावसामुळे पक्षांना खाद्याची मात्र चांगली उपलब्धता झाली आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी डबकी, नदी ओहोळ यांच्यात काही प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे पक्षांसह इतर प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण थांबली आहे. याशिवाय गवत देखील उगवले आहे. सर्वत्र गारवा पसरला असून वातावरण आल्हाददायक झाले. परिणामी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेले पर्यटक देखील सुखावले असून पर्यटनाचा आनंद घेत आहे.


अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. सतत पाऊस पडल्यामुळे आता नदी नाले व ओहोळ यांना पाणी आले आहे. आणि परिणामी डोंगर उतारावरून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. त्यामुळे ठीक-ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटक मात्र सुखावले आहेत. ताम्हिणी घाटात वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून थांबतात.- ऋषी झा, कृषी सल्लागार, पाली.


सध्याच्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी जंगल परिसरात लागलेले वणवे पूर्णपणे थांबले आहेत. वातावरणातील प्रदूषके खाली बसून प्रदूषण कमी झाले आहे. असहाय्य होत असलेल्या उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये वातावरणात गारवा आला आहे. पशु-पक्षांनादेखील गारवा व पाण्याची उपलब्धता झाली आहे.
- शंतनू कुवेसकर, निसर्ग व पशुपक्षी अभ्यासक, माणगाव-रायगड

Comments
Add Comment