Thursday, May 22, 2025

महाराष्ट्र

द्वारकामाई वृद्धाश्रमाचे श्रीनिवासराव यांचा शिर्डीत पुतळा

द्वारकामाई वृद्धाश्रमाचे श्रीनिवासराव यांचा शिर्डीत पुतळा

शिर्डी : द्वारकामाई वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवासराव बंदलामुडी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रभारी भैयाजी जोशी यांच्या हस्ते हा भावनिक सोहळा संपन्न होणार आहे.


या हृदयस्पर्शी समारंभाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प. महाराष्ट्राचे संघचालक नानाजी जाधव, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादाजी वेधक, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून शिर्डीत येऊन श्रीनिवासराव यांनी १९९७ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,कोणतीही सुविधा नसताना,स्वतःच्या पैशातून आणि मित्रांच्या मदतीने वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली.पत्नी सुधाराणी यांच्यासह त्यांनी तीन वृद्धमाता-पित्यांच्या सेवेने वृद्धाश्रमाची सुरुवात केली. अनेक अडचणींचा सामना करत, साईसंस्थान आणि सिंगापूर येथील साईभक्त टिकको साहेब यांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमाचा विस्तार केला, ज्यामुळे वृद्धांची संख्या १३५ पर्यंत पोहोचली.गेल्या २२ वर्षांत या आश्रमात २२० वृद्धांचे निधन झाले असून, त्यांचे अंत्यसंस्कार श्रीनिवासराव आणि त्यांच्या पत्नीनेच केले आहेत. आज द्वारकामाई वृद्धाश्रमात बेघर आणि अनाथ वृद्धांना मोफत सेवा दिली जाते. वॉशिंग मशीन, आरओ प्लांट, वैद्यकीय विभाग, साई मंदिर, सिनेमा हॉल अशा अनेक अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.श्रीनिवासराव बंदलामुडी यांनी आपले जीवन निराधारांच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्यांचे हे कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत राहील.या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या सेवाभावी कार्याची आठवण केली जाईल. श्रीनिवासराव यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नी सुधारानी, मुलगा शिवस्मरण, मुलगी कीर्तना या आश्रमाचा गाडा हाकत आहेत.

Comments
Add Comment