
कर्जत तालुक्यातील लाभार्थ्याचा इशारा
कर्जत : चांदे खुर्द आणि खुरंगेवाडी (ता.कर्जत) येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पात्र वैयक्तिक विहिरी प्रकरणासाठी पंचायत समितीचे अधिकारी- कर्मचारी आणि विशेष म्हणजे कंत्राटी कर्मचारी राजरोसपणे रक्कम मागत आहे. न दिल्यास त्रुटीचे कारणे दाखवत प्रकरण प्रलंबित ठेवत असल्याने सामाजिक कार्यकर्ते रामदास सूर्यवंशी यांनी "भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी हटवा शेतकरी वाचवा" यासाठी गुरुवारी आंदोलन केले.मात्र त्या पूर्वीच अधिकाऱ्यांनी पितळ उघडे होईल या भीतीपोटी आपली दालने मोकळी केली होती.
मागील अनेक दिवसांपासून कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानासाठी, वैयक्तिक लाभ प्रकरणे मंजुरीसाठी अधिकारी - कर्मचारी उघड-उघड वरकमाई मागत असल्याची अनेक तक्रारी निदर्शनास येत आहे.मात्र प्रशासन अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे.यात विशेष म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा खूप सुळसुळाट पंचायत समितीमध्ये वाढला आहे.कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द आणि खुरंगेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत दिलेल्या पात्र वैयक्तीक विहीर प्रकरणासाठी मोठी अडवणूक होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास सूर्यवंशी यांना समजली. त्यांनी गुरुवारी वैयक्तिक विहिरी प्रकरणात पात्र लाभार्थ्यांची अडवणूक का होते याचा जाब विचारण्यासाठी आणि आवश्यक असेल तर लाच देण्यासाठी वरील दोन्ही गावातील लाभार्थी आणि ग्रामस्थ यांच्या समवेत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात "भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी हटवा शेतकरी वाचवा" या मथळ्याखाली आंदोलन केले.मात्र संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी त्यापूर्वीच थातूरमातूर कारणे दाखवत आपले दालन आणि खुर्च्या खाली ठेवल्या.त्यामुळे आंदोलनकर्त्यानी आणखीच संताप व्यक्त केला.गटविकास अधिकारी यांच्या दालनाला त्यांच्या सांगण्यावरून कुलूप लावण्यात आले होते.तर बहुतांश सर्वच अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनी देखील बंद होते. आंदोलन असल्याने पोलीस कर्मचारी पंचायत समिती परिसरात आपले कर्तव्य बाजवताना दिसले. यापूर्वी देखील विहिर प्रकरण आणि घरकुल अनुदान मिळण्यासाठी याच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना अनुदान खात्यावर जमा करायचे असल्यास वरकमाई मागितली होती.
याबाबत प्रभारी गटविकास अधिकारी रुपचंद जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते अहिल्यानगर येथे बैठकीसाठी असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोणत्याही योजनेचा लाभ हवा तर आमचे हात ओले करा.पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फतवाच - रामदास सूर्यवंशी ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजना राज्य शासन राबवत असून यासाठी पात्र लाभार्थ्यांची अडवणूक पंचायत समितीच्या स्तरावर होते. कोणतेही प्रकरण मंजुरीपासून ते अनुदान लाभ मिळेपर्यंत काही अधिकारी-कर्मचारी उघडपणे रकमा मागत आहे.लाभार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यास प्रकरणात कारण नसताना त्रुटी काढणे, फाईल गहाळ झाली अशी कारणं देत लाभार्थ्यांची अडवणूक केली जाते.आज आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पलायन केले.त्यांना आमचा सामना उद्या परवा करावाच लागेल असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.आ.साहेब एकदा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात जनता दरबार भरवाच सर्वसामान्य लाभार्थ्यांची मागणी कर्जत तालुक्याला दोन कार्यक्षम आमदार लाभले आहे.मात्र त्यांची सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील अनेक वैयक्तिक प्रकरणे पंचायत समिती विभागाच्या मार्फत राबवले जात आहे.मात्र या विभागात खूप अनागोंदी कारभार पहावयास मिळत आहे.हम करे सो कायदा या अविर्भावात कर्मचारी अधिकारी वागताना दिसतात.
राजरोसपणे वरकमाई मागितली जाते.कंत्राटी कर्मचारी तर आपणच सर्वेसर्वा असल्याचे म्हणत लाभार्थ्यांची पिळवणूक करतात.त्यामुळे दोन्ही आमदारांनी एकदा बीडीओ साहेबांच्या दालनात जनता दरबार घ्यावा मग समजेल सर्वसामान्य लोकांबाबत प्रशासन काय करते?