
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबातील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वैष्णवीचा मुलगा जेमतेम नऊ महिन्यांचा आहे. नातवाचा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तुल दाखवून धमकावले, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला आठवडा उलटला तरी नातवाचा ताबा मिळालेला नाही. आता नातवाला सुरक्षितरित्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांनी त्यांच्या शिरावर घ्यावी, अशी भूमिका वैष्णवीच्या वडिलांनी जाहीररित्या घेतली आहे.
वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांकरिता वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. पती शशांक हा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वारंवार वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.