
पुणे : नैऋत्य मोसमी वारे वेगाने भारतीय भूभागाकडे प्रवास करीत असून, येत्या ४ ते ५ दिवसात ते देवभूमी केरळात दाखल होतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.
अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी लगत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, त्याचे बुधवारी कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे.याशिवाय दक्षिण कर्नाटक व आसपासच्या परिसरात हवेची द्रोणीय स्थिती आहे.बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश, तामिळनाडू लगत हवेची द्रोणीय स्थिती आहे.यामुळे मान्सून च्य वाऱ्यांना गती मिळत असून, त्यांनी श्री लंकेचा बहुतांश भाग, दक्षिण अरबी समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागराचा भाग व्यापला आहे. वाऱ्यांची घोड दौड सुरूच असून, येत्या 4 ते 5 दिवसात ते केरळात पोहोचतील.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तसेच द्रोणीय स्थितीमुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होत आहे. मंगळवारी कर्नाटक तसेच केरळच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली.गेले ५ दिवस केरळात पाऊस सुरूच असल्याने लवकरच मान्सून केरळ मध्ये दाखल होणार असल्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्र पासून ते केरळ पर्यंत येत्या सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. अनेक भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसात काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
मंगळवारी पुणे शहर आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस झाला. झाडे कोसळणे , रस्त्यावर पाणी साठले, गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.3 ठिकाणी होर्डिंग्ज कोसळली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.पुणे विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने रन वे वर पाणी साचले.