
आयुक्त संजय पाटील यांचे आवाहन
अलिबाग: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश, २०२१ अन्वये यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन रायगडचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संजय पाटील यांनी केले आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेच्या वतीने धोकादायक इमारतींची यादी जाहीर पनवेल: पनवेल महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक व ...
पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलीत नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जून २०२५ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे, तसेच ३१ जुलै २०२५ किंवा त्यापूर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सुचना व आदेश लागू राहणार आहे. सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे, तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात
येणार आहे.
पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळणार नाही. तरी सर्व मच्छीमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी नोंद घेऊन विहीत बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही. याची दक्षता घेण्याबाबतही संबंधित विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अलिबाग कोळीवाडा, बंदर रोड, कस्टम हाऊसजवळ, अलिबाग (दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२९५२२१) येथे संपर्क साधावा.