
मुंबई: धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची वर्णी लागली असून, दोन लेडी सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती झाली आहे. तर रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट
राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये धारशिव आणि रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन महिला आयपीएसच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे. रितू खोकर ह्या पाणीपत जिल्ह्यातील रहिवाशी असून 2018 च्या बॅचमधील युपीएससी उत्तीर्ण उमेदवार आहेत. त्यांचे वडिल गावचे माजी सरपंच होते.
तर धाराशिवचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. त्यांना स्वतंत्रपणे नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करून त्याजागी आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर रायगडचे माजी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील अधिकाऱ्यांच्या या मोठ्या खांदेपालट प्रकरणांमध्ये, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.