
मुंबई: आयपीएल २०२५मध्ये बुधवारी मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५९ धावांनी मात दिली. या विजयासह मुंबई आता प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. गुजरात, पंजाब आणि आरसीबी यांनी आधीच क्वालिफाय केले आहे. आता मुंबईचे नाव यात जोडले गेले आहे. चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात टक्कर होती. मात्र मुंबईने हा सामना जिंकत प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे.
प्ले ऑफमध्ये आता हे संघ
प्लेऑफमधील चार संघ आता ठरले आहेत. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि आरसीबी या संघांनी आधीच स्थान मिळवले होते. चौथ्या नंबरसाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात लढाई होती. मुंबईचे १४ गुण होते तर दिल्लीचे १३ गुण होते. दोन्ही संघांचे २-२ गुण शिल्लक आहेत. या सामन्यानंतर आता मुंबईने प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे. कारण १३ सामन्यानंतर त्यांचे १६ गुण आहेत. दिल्लीने जरी पुढचा सामना जिंकला तरी त्यांचे १५ गुण होतील.
कोणाची कोणाशी होणार टक्कर
दरम्यान, या चार संघाचे क्वालिफिकेशन ठरले आहे. मात्र प्लेऑफमध्ये कोण कोणाविरुद्ध खेळणार हे अद्याप ठरलेले नाही. आयपीएलच्या नियमांनुसार जे संघ लीग स्टेजमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहतात त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळते.
अव्वल २ संघांमध्ये क्वालिफ़ायर १ रंगते. यातील विजेता संघ सरळ फायनलमध्ये प्रवेश करतो. तर क्वालिफायर १मध्ये पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळते. हा संघ एलिमिनिटेरमधील विजेत्याशी लढतो. क्वालिफायर २मधील विजेत्याची टक्कर क्वालिफायर १च्या विजेत्याशी होते.