
५ व्या शतकातील जहाजाचे नवे रूप!
मुंबई : भारतीय नौदलाच्या वतीने कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राने बांधलेल्या जहाजाचा (Ancient Stitched Ship) समारंभपूर्वक औपचारिकपणे आपल्या ताफ्यात समावेश केला गेला. नौदलाने या जहाजाचे नामकरण आयएनएसव्ही कौंडिण्य असे केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. या समारंभाच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध जहाज बांधणीच्या वारशाचा गौरव करणाऱ्या एका अद्वितीय प्रकल्पाची यशस्वी सांगता झाली.
नैसर्गिक राळेचा वापर
आयएनएसव्ही कौंडिण्य हे एका शिवलेल्या शिडांचे जहाज आहे. हे जहाज अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून प्रेरणा घेत साकारलेली ५व्या शतकातील एका जहाजाची प्रतिकृती आहे. जुलै २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारतीय नौदल आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स (M/s Hodi Innovations) यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर, या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली होती. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने आर्थिक पाठबळ पुरवले होते. प्राचीन शिलाई तंत्राने बांधलेल्या या जहाजाच्या सांगाड्याची प्रत्यक्ष बांधणीची मुहूर्तमेढ (Keel laying) २०२३ मध्ये झाली होती. या जहाजाची, संपूर्ण बांधणी केरळमधील आघाडीचे जहाजबांधणी कारागीर बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील कुशल कारागिरांच्या चमूने अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमातून शिलाई पद्धतीने केली. त्यासाठी त्यांनी नारळाच्या दोऱ्या (coir rope), नारळाचे तंतू (coconut fibre) आणि नैसर्गिक राळेचा (natural resin) वापर केला आहे. या साधनांचा वापर करून कारागिरांनी जहाजाच्या लाकडी फळ्यांची जहाजाच्या तळासोबत (hull) मजबूत बांधणी केली आहे. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये गोव्यात या जहाजाचे जलावतरण केले गेले होते.

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. पण वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरची माणसंच कारणीभूत असल्याचा आरोप होत ...
या प्रकल्पात भारतीय नौदलाने मध्यवर्ती भूमिका बजावली. नौदलाने जहाजाचे संरचनात्मक आरेखन, तंत्रज्ञान विषयक प्रमाणीकरण आणि बांधकाम प्रक्रियेच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळली. अशा स्वरुपाच्या जहाजांचे कोणतेही जुने नकाशे (blueprints) उपलब्ध नसल्यामुळे, जहाजाचे संरचनात्मक आरेखन हे प्रतिमाशास्त्रीय स्रोतांवरून (iconographic sources) निश्चित करावे लागले होते. नौदलाने जहाजाचा सांगाडा आणि पारंपरिक रिगिंगची पुनर्निर्मिती करण्यासाठी जहाज बांधणीकारांसोबत सहकार्यपूर्ण भागीदारी केली होती. यासोबतच हायड्रोडायनामिक अर्थात जलआयामी प्रारूप चाचणीच्या माध्यमातून (hydrodynamic model testing) मद्रास मधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सागरी अभियांत्रिकी विभागाद्वारे जहाजाच्या संरचनात्मक आरेखनाची वैधता तपासली जाईल तसेच तंत्रज्ञान विषयक अंतर्गत मूल्यांकनही केले जाईल याची सुनिश्चितीही नौदलाने केली होती.
प्राचीन भारताच्या समृद्ध सागरी परंपरांना उजाळा
नौदलाच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट केलेल्या या जहाजाला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची जोड आहे. या जहाजाच्या शिडांवर गंडभेरूंड आणि सूर्याचे नक्षीकाम आहे, तर जहाजाच्या अग्रभागी सिंहाची याळी कोरलेली आहे. याशिवाय जहाजाच्या डेकवर प्रतीकात्मक हडप्पाकालीन शैलीच्या दगडी नांगराचे सुशोभिकरण केलेले आहे. या प्रत्येक घटकातून प्राचीन भारताच्या समृद्ध सागरी परंपरांना उजाळा दिला गेला आहे. हिंद महासागरातून आग्नेय आशियापर्यंत सागरी प्रवास केलेले पुराणकालीन भारतीय खलाशी कौंडिण्य यांच्या नावावरून या जहाजाचे नामकरण कौंडिण्य असे केले गेले आहे. हे जहाज भारताच्या सागरी संशोधन, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या परंपरांचे एक मूर्त प्रतीक बनले आहे.
Indian Naval Sailing Vessel म्हणजेच INSV म्हणून नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेले कौंडिण्य हे जहाज नौदलाच्या कारवार इथल्या तळावर तैनात राहील. आता यानंतर या जहाजाच्या पुढच्या ऐतिहासिक टप्प्याचा प्रारंभ होईल. त्याअंतर्गत या वर्षाच्या उत्तरार्धात गुजरात ते ओमान या प्राचीन व्यापारी मार्गावरून या जहाजाच्या आंतरमहासागरीय प्रवासाची तयारी केली जाणार आहे.