Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Vaishnavi Hagawane Case: हगवणेंच्या मोठ्या सुनेचा छळ! वैष्णवीच्या जावबाईने देखील केला मारहाण झाल्याचा आरोप

Vaishnavi Hagawane Case: हगवणेंच्या मोठ्या सुनेचा छळ! वैष्णवीच्या जावबाईने देखील केला मारहाण झाल्याचा आरोप

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची ती सून होती. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण ताजे असतानाच, हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिनेही आता हगवणे कुटुंबावर आरोप केले आहेत. वैष्णवी प्रमाणे तिलाही मारहाण केल्याचा आरोप मयूरीने केला आहे. मात्र, पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध कुठलीच तक्रार नोंदवली नसल्याची माहिती मयुरीने दिली आहे. ज्यामुळे मुळशी येथील वैष्णवी आत्महत्या प्रकरण आता चांगलेच तापताना दिसून येत आहे.


पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेच्या कुटुंबीयांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध पोलिस तक्रार केली असता, हे प्रकरण जगासमोर आले. सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या मारहाणीला आणि जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हंटले जाते. ज्यामुळे हगवणे पिता-पुत्राची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टीच्या पत्रावर 21 मेची तारीख आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाने ही कारवाई केली आहे. दरम्यान हगवणे कुटुंबियाची मोठी सून मयूरी जगतापने देखील आपल्याला मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात तिने तिचा दीर म्हणजेच वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू- सासरे आणि नणंद या चौघांकडून बेदम मारहाण केली जात असल्याचा आरोप केला आहे. पती घरी नसताना तिला ही लोकं मारहाण करत असत असं तिने पुढे सांगितलं. "आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे, त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिळे. त्यांच्या कुटुंबातील (हगवणे) कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना (पती) सुद्धा होती, अशा शब्दांमध्ये हागवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप हिने सनसनाटी खुलासा केला आहे. सासरा, सासू नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता, असे तिने कबूल केलं.



मयुरी जगतापने केले सासरच्यांवर गंभीर आरोप 


मयुरी जगतापने आपल्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे. तिने सांगितले की, '२०२२ मध्ये माझं सुशीलसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला माझ्या सासरची लोकं माझ्याशी चांगले वागले पण नंतर त्यांनी मला तरस द्यायला सुरुवात केली. माझा दीर, नणंद, सासू सतत माझं छळ करत होते आणि मारहाण करत होते. माझी नणंद करिश्मा माझ्याशी सतत भांडायची. मला वैषणवीसोबत कधीच बोलू दिलं नाही. वैष्णवीचा नवरा देखील मला मारायचा." असं गंभीर आरोप तिने केला आहे.



"माहेरी गेले नसते, तर वैषणवीच्या जागी मी स्वतः असते"- मयूरी जगताप


पुढे तिने असे देखील सांगितले की, "माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टी मी जेव्हा सांगितल्या तेव्हा माही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. वेगळं राहत होते तरी देखील ते त्रास देत होते. माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. ही पाहून माझे सासरचे माझ्या पतीला देखील त्रास देऊ लागले. ते माझी बाजू घ्यायचे म्हणून त्यांनाही ते मारहाण करायचे. शेवटी ही लोकं सुधारणा नाहीत, ही कोणत्याही ठरला जाऊ शकतील याची कल्पना माझ्या पतीला आली, आणि त्यांनी मला माझ्या माहेरी आणून सोडले. जर त्यांनी तसे केले नसते तर आज वैष्णवीच्या जागी मी स्वतः असते. " असे खळबळजनक वक्तव्य मयुरीने केले.


सध्या मयुरी तिच्या माहेरी राहते. ती मयत वैष्णवीची मोठी जाव असून, तिने हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्याचा पडदा फाडला आहे.



वैष्णवी हगवणेचं नऊ महिन्याचं बाळ तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द


वैष्णवीच्या आत्महत्येला सहा दिवस झाले आहे. या दरम्यान वैष्णवीचे नऊ महिन्याचे बाळ कुठेय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता ते बाळ सापडले असून वैष्णवीच्या आई-वडिलांकडे त्या बाळाला सुपूर्द करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणदेला अटक केली आहे. तर तिचे सासरे आणि दीर अद्याप फरार आहेत. या दोघांचा शोध पोलिस करत आहेत.


Comments
Add Comment