
अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ६४व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सवर जबरदस्त विजय मिळवला आहे. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातसमोर विजयासाठी २३६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र गुजरातला केवळ २० षटकांत इतक्याच धावा करता आल्या. गुजरातकडून शाहरूख खान, जोस बटलर, रुदरफोर्ड, शुभमन गिल यांनी चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले.
दोन्ही संघादरम्यानचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला होता मिचेल मार्शच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २३५ धावा केल्या होत्या. मिचेल मार्शने या सामन्यात धमाकेदार खेळी केली.
लखनऊची सुरूवात धमाकेदार राहिली. मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५९ बॉलमध्ये ९१ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान मार्करमने केवळ ३३ बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. साई किशोरने मार्करमला बाद करत ही भागीदारी संपवली. मिचेल मार्शने या सामन्यात तुफानी खेळी केली. त्याने ५६ बॉलमध्ये शतक ठोकले आहे. मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांचीही चांगली जोडी जमली होती. मिचेल मार्शने ६४ बॉलमध्ये ११७ धावा तडकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ८ षटकार ठोकले.
सध्याच्या हंगामात गुजरात टायटन्सने आतापर्यंत १२ पैकी ९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सनेही तितकेच सामने खेळले आहेत. मात्र त्यांना केवळ ५ सामने जिंकता आले आहेत. लखनऊचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे.