
भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
विणेच्या मंजुळ तालावर “नारायण... नारायण” असा नाम जप करीत त्रैलोक्यात अनिरुद्ध संचार करणारे नारदमुनी आपल्याला चांगले ज्ञात आहेत. “कळलावे नारद!’’ असेही त्यांचे विशेषण आपण ऐकलेले असते. खरंतर देवर्षी नारद हे विश्वाचा समतोल साधणारे महान व्यक्तित्व होत. सज्जनांच्या मदतीसाठी नारदमुनी नेहमीच कार्यरत राहिले आहेत. त्यांनी गुणीजनांना सत्कार्यासाठी वेळोवेळी योग्य सल्ले दिले आहेत. जेथे मद, मान, दंभ, विद्वेष या आसुरी शक्तींचा अतिरेक होतो, तेथे देवर्षी नारदांनी योग्यवेळी प्रविष्ट होऊन त्या शक्तीचा बीमोड करण्यास साह्य केले आहे. देव, दानव, मानव या सर्वांचे अंतर्मन ते स्वयंप्रेरणेने जाणत असल्याने सुष्ट-दुष्ट अशा कोणाहीकडे देवर्षी नारदांचे आगमन झाले तर त्यांचे सर्वांनीच प्रेमादराने स्वागत केल्याचे दिसून येते. ज्यांना समस्त ब्रह्मांडाचे राजकारण व समाजकारण अचूकपणे कळते, असे व्यक्तित्व म्हणजे नारदमुनी होत. भगवद्गीतेत अर्जुनाला आपल्या विभूती सांगताना भगवानांनी, देवर्षीणांच नारदः । (गी. १०.२६) देवर्षीमधले नारदमुनी मी आहे, असे म्हटले आहे. यावरून नारदमुनींची थोरवी कळून येते.
जंगलात राहणाऱ्या वाल्याचे वाल्मिकी ऋषीत परिवर्तन देवर्षी नारदांमुळेच झाले, वाल्मिकी ऋषींना श्रीराम चरित्र लिहिण्याची प्रेरणाही नारदमुनींनीच दिली. त्याचप्रमाणे महर्षी व्यासांना श्रीमत् भागवतपुराण लिहायला देवर्षी नारदांनीच प्रेरित केले. या भागवतात नारदांच्या पूर्व चरित्राचे वर्णन आहे. देवर्षी नारद पूर्वजन्मी दासीपुत्र होते, मात्र त्याची माता योग्यांच्या घरची दासी होती. त्यामुळे बालवयापासूनच नारदमुनींच्या मनावर भागवत धर्माची म्हणजेच भगवंतांच्या गुणवर्णन श्रवणाची गोडी लागली. भगवंत हे एकाच रूपागुणाच्या चौकटीत सीमित नसून सर्व चराचरांत भरलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या अवतारांकडून घडणारी कर्मे ही सर्वांचे हित जपणारी असतात. आपणही भगवंतापासून अलग नसल्याने केवळ मायेमुळे या प्रपंचात बांधले गेलो आहोत, याची जाणीव नारदमुनींना झाली. त्यांच्या मातेचे निधन झाल्यावर त्यांचा संसारमोहाचा पाश नष्ट झाला, ते घरातून बाहेर पडले.
घोर अरण्यात जाऊन तेथेच परमेश्वराच्या दर्शनाची तीव्र आंस धरून त्याचे ध्यान करू लागले. त्यावेळी त्यांच्या हृदयात परमेश्वराचे स्वरूप प्रकट झाले. पण नारदांच्या डोळ्यांतून आनंदाच्या अश्रुधारा वाहत असताच परमेश्वरी स्वरूप गुप्त झाले. त्यावेळी नारद दुःखाने कासावीस झाले. भगवंतांच्या भेटीची तळमळ पराकोटीला गेल्यावरच मीपणाच्या पाशातून जीव बाहेर पडून भगवंताशी तादात्म्य पावू शकतो. परमेश्वरी विरहाचा आत्यंतिक ताप भोगीत असलेल्या नारदांच्या कानी आकाशवाणी आली की परमभक्तपदाची योग्यता तुला देहपतनानंतर प्राप्त होईल आणि तुझी बुद्धी चिरंतन भगवंताच्या ठायी स्थिर होईल. ही आकाशवाणी ऐकल्यानंतर नारदमुनी पुनश्च हरिध्यानात मग्न झाले. देहपतनानंतर ते शयन करणाऱ्या परमेश्वराच्या श्वासासह त्यांच्या उदरात शिरले. भगवंत जागे झाल्यावर नारदमुनी सप्त ऋषींसह भगवंतांच्या प्राणासह उत्पन्न झाले. म्हणून या सर्व ऋषींना ब्रह्माचे पुत्र म्हणतात. ब्रह्मकुमार देवर्षी नारद अखंड ब्रह्मचर्याचे पालन करीत, ब्रह्मभावात स्थित होत हरिनाम गजर करीत त्रैलोक्यात भ्रमण करू लागले. भक्तिशास्त्रात नारदमुनींची ‘नारद भक्तिसूत्रे’ प्रमाण मानली जातात. त्यात भक्तीची अतिशय सुंदर आणि व्यवच्छेदक व्याख्या त्यांनी दिलेली आहे,
तदर्पिताखिला चारिता तद् विस्मरणेन परम व्याकुलतेति।
भगवंताची अनन्य भक्ती करणारा भक्त आपली संपूर्ण कर्मे भगवंताला समर्पित करतो आणि जर एखादा क्षणही त्याला भगवंताचा विसर पडला तर तो परम व्याकुळ होतो. अशा भक्ताची जी भक्ती तीच खरी भक्ती अशी भक्तीची व्याख्या नारदमुनी करतात.
(पूर्वार्ध)