
देवळा : येथील ग्रामीण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे एक्सरे व औषध साठा रूममधील वस्तू जळून खाक झाल्या. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच अग्नी सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला .
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळा - मालेगाव रस्त्यावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात शॉटसर्किट झाले . यात एक्सरे व औषध साठा रूममधील वस्तू जळून खाक झाल्या आहेत . यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत फायर (सुरक्षा यंत्रणा) च्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. यावेळी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण देखील होते.
या घटनेने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्या दिवशी देवळा शहरात रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला होता. विजेच्या धक्क्याने रुग्णालयात शॉट सर्किट झाल्याचा काहींनी प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी घटनास्थळी दुसऱ्या दिवशी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील अंतर्गत लाईट फिटिंगची तपासणी केली असता हा प्रकार शॉट सर्किटमुळे घडल्याचे सांगितले. तसेच, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश अहिरे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवल्याचे सांगितले. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, नुकसान मोठ्या प्रमाणातझाल्याचे समजते.