Wednesday, May 21, 2025

अध्यात्म

प्रयत्नांच्या सावल्यांत हरवत गेलेले रंग

प्रयत्नांच्या सावल्यांत हरवत गेलेले रंग

ऋतुराज : ऋतुजा केळकर


“काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति।
सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धाः सर्वयत्नाः फलन्ति।।“


हे सुभाषित आहे भास या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराच्या “प्रतिज्ञायौगन्धरायणम्” या नाटकात आहे. हे नाटक कौशांबीचा राजा वत्सराज उदयन की जो आपल्या वीणा वादनाच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध होता, त्याला उज्जयिनीचा राजा प्रद्योत महासेन याने कपट करून बंदी बनवले. राजा उदयनला मुक्त करण्यासाठी त्याचा मंत्री यौगन्धरायण दोन कठीण प्रतिज्ञा करतो, यावर हे कथानक आधारित आहे. हे नाटक राजकीय डावपेच, निष्ठा आणि धैर्य यावर आधारित असून संस्कृत साहित्यातील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. आता सर्वप्रथम आपण या संस्कृत सुभाषिताचा मराठीत अर्थ समजून घेऊया. या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, “लाकूड सतत घासल्यावर अग्नी निर्माण होतो, तसेच जमीन खोलवर खणल्यावरच पाणी मिळते. त्यामुळे मनुष्याने प्रयत्न सोडू नये. कारण कोणतेही कार्य अशक्य नाही. मार्गक्रमण सुरू केल्यावर सर्व प्रयत्न यशस्वी होतात.” हे सुभाषित माणसाने सातत्याने प्रयत्न करावेत आणि हार मानू नये, असा प्रेरणादायक संदेश देतं. निश्चितच धैर्य, चिकाटी आणि मेहनतीने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. त्यामुळे उत्साही लोकांना अशक्य असे काही नाही. योग्य रीतीने प्रयत्न केल्यावर प्रत्येक गोष्ट ही फलद्रूप होतेच.

मानवी जीवन हे सतत बदलणारे आणि अनिश्चिततेने भरलेले आहे. अनेकदा आपल्यासमोर अशा परिस्थिती येतात की जिथे हार मानावीशी वाटते. त्यामुळे एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि प्रयत्न करणाऱ्याला यश हमखास मिळते. खर सांगायचं झालं तर मानवाच्या मानसिक, शारीरिक क्षमतेची तसेच आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा ही संकटात होते. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगतात,
“कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन।”


म्हणजेच फळाची चिंता न करता तू तुझे कर्तव्य कायम करत राहा. हीच जीवनाची खरी दिशा आहे आणि जेव्हा माणूस धैर्याने आणि श्रद्धेने कार्य करतो, तेव्हाच त्याला ईश्वरी मदत मिळते. आपली मेहनत आणि संकल्पशक्ती हीच खरी साधना आहे. संतशिरोमणी तुकारामांनीही लिहून
ठेवले आहे,
“अश्रांत पावलां चालत जावे।
रस्ता फुटावा आत्मबळे।।”


याचा अर्थ देखील स्पष्ट आहे की, तुम्ही थांबू नका, सतत पुढे जात राहा, जेव्हा आत्मविश्वास आणि धैर्य असेल, तेव्हा मार्ग आपोआपच निर्माण होतो. या अभंगातून हे शिकायला मिळते की, जगण्याचा खरा मार्ग हा सतत प्रयत्न करत राहण्याचा आहे. संकटे आली, अडथळे आले तरीही कायम पाय रोवून पुढे जात राहिले, तर मार्ग मिळतोच! आत्मबल आणि श्रद्धा हीच खरी जीवनाची शिदोरी आहे. कसं आहे ना की, सुख दुःखाच्या अंधाराच्या गर्द छायांतून जीवनाचा प्रवास हा सुरूच असतो हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. आपलं प्रत्येक पाऊल अनिश्चिततेच्या सावलीत गुंतत जातं, पण थांबणं हा पर्याय नसतोच. पायांतले अपयशाचे तडे, अपमानाचे मनातले घाव, क्षणोक्षणी वेदनेची किनार घेत मार्गक्रमण हे तर क्रमप्राप्तच आहे. तरीही आपल्याला आपली वाट शोधायची असते, स्वतःच्या आतल्या ज्योतीवर विश्वास ठेवून आणि तसं बघायला गेलं तर रस्ता हा आपोआप कधीच सापडत नसतो. तो चालण्याच्या ठशांतून उमलतो, ठेचकाळण्याच्या वेदनांतून आकार घेतो. त्यामुळे आत्मबळ हेच त्या प्रवासाचं संचित असतं हे जर उमगलं तर मग, “अंधार फक्त काळ्या रंगाचा खेळ आहे, त्यापलीकडे उषःकाल उभा आहे हा एक दृढ विश्वास” आपोआपच आपल्या मनात आणि कृतीत अंगिकारला जातो. म्हणूनच माणसाने चालत राहावं. थांबणं म्हणजे पराभव. पाऊल पुढे टाकलं की क्षितिज आपोआप विस्तारणार.


आता यशाचे क्षितिज म्हणजे तरी नक्की काय? ‘क्षितिज’ म्हणजे दूरवर पसरलेली माणसाच्या अंतःकरणातली एक काल्पनिक वाट. यश तिथं जाऊन थांबतं का? तर नाही. ते फक्त क्षणभर त्या संधिप्रकाशात विसावून पुन्हा नवे आकाश शोधतं. तो आहे एक प्रवास कधीही न संपणारा. ज्या वाटेवर मनाच्या गतीचा मंत्र गुंजतो. कधीकधी येतो तो निखळ आनंदाच्या स्वरूपात, तर कधी तलवारीच्या धारेसारखा खोल जखम करून जातो आणि आयुष्याचं म्हणाल तर यशाच्या शोधात ते कायमच भरकटतं, पण खरं यश म्हणजे स्वतःला शोधणं गरजेचे आहे, त्या अनोळखी प्रकाशरेषेत स्वतःचं प्रतिबिंब पाहणं ते ओळखणे गरजेचे आहे, तेव्हा कुठेतरी माणूस स्वतःच्या क्षितिजावर पोहोचतो. पण नेमकं कशासाठी? त्याचा मात्र थांग त्याला स्वतःलाच नसतो. कारण कधीकधी यश म्हणजे फक्त एका चंद्रकोरीसारखी शांत स्वीकृतीच्या रुपात आपल्या आयुष्यात डोकावत तर कधी कायम अपूर्ण क्षणासारखं निसटत, पण त्याच्या सावलीतच यशाचा नवाच रंग उमलत राहतो.


पण मग यश आणि कर्म दोन विलग वाटा आहेत की एकाच अस्तित्वाचे दोन अर्धवट प्रतिबिंब? कारण यश हे फक्त अंतिम बिंदू नसतो. तो एका प्रवासाचा धूसर किनारा असतो, वाट चुकल्यासारखा, पण शोधल्याशिवाय न सापडणारा आणि त्या प्रवासात त्याचा एकमेव सहचर आहे आणि तो म्हणजे त्याचे स्वतःचे ‘कर्म’ की जे कधीच थांबत नाही तर ते आपल्या यशासोबत सावलीसारखे चालत राहते. कर्म ही आपल्याच अस्तित्वाची एक आर्त लय आहे. ते स्वतःच्या परिभाषेत पुढे जाते, यशाच्या कवडसाला स्पर्श करता ते कायम त्याच्या सावलीत राहते. कधी ते त्याच्याच लखलखीत प्रकाशात चमकते, तर कधी एका शांत चंद्रकोरीसारखा अव्यक्तच राहते. “यश” हे एक छायाचित्र आहे पण ते क्षणभंगुर आहे, तर “कर्म” हा त्याचा अंधुक प्रकाशझोत की जो अनंत प्रवाहात वाहत राहणार. म्हणूनच, आयुष्याच्या कुठल्याही वळणावर थांबू नका, आपले मार्ग आपणच शोधा. कर्माची योग ती गती, पायसता राखा. मग पहा यश स्वतःहून तुमच्या पदरवाला घसघशीत आणि सुंदर उत्तर देईल. आणि अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचे झालं तर,


क्षितिज आभासाचं आखीव चित्र ...
पाऊल पुन्हा उमटतं, तरी अंतर धूसरच...
प्रयत्नांच्या सावल्यांत हरवत गेलेले रंग अन...
धुक्याच्या दाराआड उगवणारा सूर्योदय...
शब्दांचा सागर लाटांसारखा उसळतो...
वाऱ्यावर लिहिलेल्या स्वप्नांचे अर्धवट किनारे...
अंधाराच्या ओठांवर चांदण्याचा निळा स्पर्श...
तरी मनाचा सूर्य अजूनही शोधातच…

Comments
Add Comment