
प्रशासन करणार व्यापक जनजागृती
पालघर :शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची सर्वत्र झुंबड होत असताना पालघर जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळे आहे. ५० आणि ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे, शेळी मेंढ्या, कोंबड्या वाटप करण्यात येणार असून, या योजनांसाठी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात.
शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे, शेळी, मेंढ्या, कोंबड्या आदींचे वितरण करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना ५० ते ७५ टक्के अनुदान देण्यात येते. तसेच पशुपालकांसाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनांमध्ये दोन दूधाळ गायी-म्हशीं, ११ शेळी-मेंढींचा समावेश असलेला गट, १ हजार पक्ष्यांच्या क्षमतेच्या मांसल कुक्कुट शेड उभारणीसाठी अर्धसहाय्य, तसेच १०० कुक्कुट पक्ष्यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाणार आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, वैयक्तिक लाभाच्या या योजनांसाठी राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद असला तरी जिल्ह्यात मात्र निरुत्साह दिसून येत आहे. २ मे पासून या योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकरी लाभार्थ्यांकडून अद्याप चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
५ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत : पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज www.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरवरील AH-MAHABMS अॅपद्वारे करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ जून २०२५ पर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रांची अपलोड करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२५ अशी आहे. योजनांची माहिती देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९५ पशुसंवर्धन रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील पशुपालन व्यवसायाला बळकटी
देणाऱ्या या योजनांमुळे आर्थिक स्थैर्य मिळेल.
- डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.