मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाचा प्रवास अधिक सुखकर ठरणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंतच्या किनारी मार्गावर जलवाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे.
नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हायटेक बोट सेवा सुरू
मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माझगावपासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी या मार्गावर प्रवासी बोट सेवा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'एम टू एम' नावाची हायटेक बोट २५ मे रोजी भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे.
अगदी काही तासांत गाठता येणार गाव
जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून मुंबई ते रत्नागिरी अंतर अवघ्या ३ तासांत, तर मालवण आणि विजयदुर्ग अंतर ४.५ तासांत गाठता येणार आहे. ही सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणात जाताना पावसामुळे होणारी गैरसोय, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडी या त्रासाचा सामना करावा लागत असल्यामुळे चाकरमान्यांना ही जलसेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.