Thursday, May 22, 2025

ताज्या घडामोडीरायगड

माणगांवमध्ये विजेच्या शॉकने ४ गुरे दगावली!

माणगांवमध्ये विजेच्या शॉकने ४ गुरे दगावली!

माणगांव : माणगांव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी व बोन्डशेत गावच्या मध्यामध्ये २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची हायटेन्शन लाईन वरील कंडक्टर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली माळरानावर पडल्याने तेथे चरणाऱ्या चार गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.


या दुर्दैवी घटनेत शेतकरी महादेव आंबेकर यांचे दोन बैल, अनंत शिगवण आणि दीपक चव्हाण या दोन शेतकऱ्यांच्या गाभण गायी अशा चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. बैल म्हणजे शेतकऱ्यांचा आधार… आणि गाभण गाय म्हणजे उद्याच्या पिढीची आशा. या एकाच धक्क्याने तीन शेतकरी कुटुंबांवर अंधार दाटला.



ही बातमी समजताच महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. दुसऱ्या दिवशी माणगांव पोलीस, महावितरणचे अधिकारी, वनविभाग, सरपंच दत्ताराम खांबे, ग्रामसेवक, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी पंचनामा केला. पण हळूहळू गावात नाराजीचा सूर चढू लागला. कारण ही दुर्घटना ‘निसर्गाची’ नसून महावितरणच्या हलगर्जीपणाची असल्याचा गावकऱ्यांचा ठाम आरोप आहे.



"बैल गेले... पण आमचं भविष्यही गेलंय!" अशा भावना हरवलेल्या नजरेतून व्यक्त होत होत्या. ऐन शेतीच्या कामकाजाच्या तोंडावर शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसला आहे. ग्रामस्थ आणि सरपंच खांबे यांनी सरकार व महावितरणकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. बी. सोननीस यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सुपूर्द केला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहोत. संबंधित प्रकरणी निर्णय कंपनी प्रशासन घेईल.


आता प्रश्न एवढाच आहे, निष्पाप जनावरे गेल्यानंतरही जबाबदारी कोण घेणार? आणि या जीवांचं नुकसान भरून काढण्यासाठी निर्णय किती लवकर घेतला जाणार?

Comments
Add Comment