
ठाणे : कल्याण पूर्व येथील मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचार करावेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढून सदर इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यास त्यांनी सांगितले.
कल्याण पूर्व येथील या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामावेळी अचानक मधला स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून या दुर्घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच त्यानंतर त्यांनी बचाव कार्याला वेग आणण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी बोलवण्यास सांगितले. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या रहिवाशांवर गरज असल्यास खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत असेही निर्देश दिले. तसेच यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटूंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत दिली जाईल असेही सांगितले. तसेच या बचाव कार्याचा आढावा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी स्वतः त्यात जातीने लक्ष घालावे असेही निर्देश दिले. या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या मदतकार्याचा उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः वेळोवेळी आढावा घेत असून लागेल ती सर्व मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.