
बहुसंख्य लोक तोंडाने आपण खूप विज्ञानवादी आहोत असे सांगतात, पण कोणत्याही शुभकार्याला नारळ फोडण्याचे आणि कसलेही धर्म कार्य करतात. वर त्यांचे समर्थन असे असते की, मी तर विज्ञानवादी आहेच पण माझी पत्नी किंवा आई किंवा घरच्यांच्या समाधानासाठी हे करावे लागते. त्या ढोंगाच्या बतावणीला डॉ. जयंत नारळीकर यांनी आयुष्यभर चपखलपणे नाकारले आणि खरा विज्ञानव्रती काय असतो हे दाखवून दिले. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यात सकाळी निधन झाले. त्यांच्या नावावर अनेक सिद्धांतांचे जन्म आहेत तसेच बिग बँग थिअरी आणि गुरूत्वाकर्षण सिद्धांत विकसित करण्याचे संशोधन कार्य आहे. नारळीकर यांनी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळवला. नारळीकर यांचे कार्य एवढ्यापुरते सीमित नाही. त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आणि त्यांच्या अधिपत्याखाली आययूसीएने उत्कृष्टता केंद्र म्हणून ख्याती मिळवली. त्यांना अनेक सन्मान मिळवले, पण त्यांच्या बिग बँग थिअरीच्या संशोधनासाठी ते जगभर गणले गेले. बिग बँग थिअरी म्हणजे अशी आहे की, आपले युनिव्हर्स हे अशा लहान बिंदूपासून सुरू झाले आणि ते विस्तारत आज आहे तसे व्यापक आणि विशाल झाले. त्यांनी फ्रेड हॉयल यांच्यासोबत ग्रॅव्हिटी थिअरीवर काम केले आणि एक सिद्धांत विकसित केला जो आज नारळीकर- हॉयल सिद्धांत म्हणून प्रख्यात आहे. हीच आहे ती कॉन्रफर्नल ग्रॅव्हिटी थिअरी. विज्ञानाचे अवडंबर न माजवता वैज्ञानिक दृष्टिकोन सदासर्वदा बाळगणारे डॉ. जयंत नारळीकर हे विज्ञानाचे व्रती होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
डॉ. नारळीकर यांचे विज्ञानातील कार्य अतुलनीय आहे आणि त्यांचे सिद्धांत तर बेजोड आहेत. त्यांनीच विकसित केलेला हॉयल नारळीकर गुरूत्वाकर्षण सिद्धांत हा आज जगभरच्या शास्त्रज्ञांसाठी आदर्श होऊन बसला आहे. त्यांचा कॉन्फर्नल ग्रॅव्हिटी सिद्धांत हा विकसित केला आणि तो आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताला वेगळा दृष्टिकोन देतो. पण नारळीकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रूक्ष विज्ञानाला आपले मानले नाही, तर त्याला लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यासाठी विज्ञान कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्याही अतोनात लोकप्रिय झाल्या आणि त्यातीलच एक आहे ‘वामन परत न आला’ ही कादंबरी. केवळ विज्ञानकथा हा समाजाशी फटकून वागणारा असू शकत नाही, तर त्याने समाजासाठी त्याचे योगदान दिले पाहिजे हे नारळीकर यांनी पटवून दिले. त्यासाठी त्यानी विलक्षण विज्ञानकथा लिहील्या आणि त्या लोकप्रिय झाल्या. आज विद्यार्थी इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याच्या मागे लागला आहे किंवा कॉम्प्युटरमध्ये एखादी पदवी मिळवून मोठी नोकरी पटकावायची हेच त्याचे स्वप्न राहिले आहे. ते नारळीकर यांना शक्य असते, तर त्यांनी ते केलेही असते. पण त्यांनी तसे केले नाही. विज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायचा या हेतूने ते पछाडले गेले आणि त्यातून त्यांनी विज्ञानकथा लिहील्या. आज प्युअर सायन्स घेऊन जाणारे किती विद्यार्थी आहेत याचे संशोधन करावे लागेल. विद्यार्थ्यांना दहावीला ९० टक्के गुण मिळाले किंवा बारावीला मेरिटमध्ये पास झाला की लगेच त्याला इंजिनियर होण्याची स्वप्ने पडतात. पण बेसिक सायन्सेसकडे विद्यार्थी वळतच नाहीत. ही खंत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विज्ञान संमेलनात बोलून दाखवली होती. आजच्या या प्रश्नाला नारळीकरांचे आयुष्य हे चांगले उत्तर आहे.
नारळीकर यांचा जन्म रँगलर नारळीकर यांच्या घरात झालेला. त्यांची आईही संस्कृत स्कॉलर होती. त्यांनी विज्ञानाचे संशोधन हाती घेतले आणि प्रचंड कार्य केले. डॉ. नारळीकर यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आणि त्यात पद्मविभूषण, तसेच वयाच्या २६ व्या वर्षी मिळालेला पद्मभूषण हा पुरस्कार ही आहे. पण त्यानी साहित्यात जे कार्य केले त्याला तोड नाही. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आणि त्यांनी विज्ञानकथा वाचकांमध्ये लोकप्रिय बनवल्या. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. कारण विज्ञानकथा म्हणजे वाचकांच्या डोक्यावरून जायला हवी अशी जी धारणा होती ती नारळीकर यांनी पुसून टाकली. जयंत नारळीकर हे कोणतेही दंभ न करताही विज्ञानाचे शिलेदार होते आणि त्यांनी ते कार्य आपण होऊन स्वीकारले होते आणि ते शेवटपर्यंत पुढे नेले. कोणताही वैज्ञानिक नम्र असतो आणि त्याचे नारळीकर हे मूर्तिमंत रूप होते. त्यानी कधीही आपल्या संशोधनाचा दंभ मिरवला नाही. नाही तर आपल्याकडे थोडे यश मिळाले, तर अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे आणि इतरांना शहाणपण शिकवणारे आणि धर्म नाकारणारे वैज्ञानिक आहेत. पण विज्ञान हे खरेखुरे विज्ञान असते आणि त्यात दुसरे काही भेसळ नको असे मानणारे जयंत नारळीकर होते असे आदराने म्हणावे वाटते. त्यांचा वाढदिवस हा विज्ञानकथा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी खगोलशास्त्रज्ञ म्हणून कार्य केले त्याला जगात कुठेही तोड नाही. विज्ञान हे अंतिम ज्ञान नाही हे अध्यात्मिक गुरूंइतकेच नारळीकरांसारखे व्रतस्थ ही जाणत. इतिहासात साक्ष आहे की कोपर्निकसने अगोदर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे संशोधन केले होते. त्याला जगमान्यताही मिळाली होती. तो सिद्धांत नाकारणाऱ्या अनेकांना फाशी देण्यासाठी तत्कालीन समाजाने काढले होते. पण कोणतेही विज्ञान हे परिपूर्ण कधीच नसते आणि त्यात नवनवीन संशोधन होत असते. त्यामुळे कालांतराने कोपर्निकसचा सिद्धांत चुकीचाच ठरला. नारळीकर हे स्वतःला अंतिम ज्ञान मिळाले आहे हे समजत नसत. तसे ते कोणत्याही शास्त्रज्ञांनी समजू नये. म्हणून तर त्यांना व्रतस्थ शास्त्रज्ञ म्हटले जाते.