
मदतीसाठी शासनाकडे मागितला सव्वा कोटींचा निधी
पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ६ व ७ मे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे आठ तालुक्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यातील घरांची जास्त पडझड झाली आहे. पालघर तालुक्यात ५५० तर डहाणू तालुक्यातील ६५२ घरांचे नुकसान झाल्याचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात ६ मे च्या सायंकाळपासूनच वादळी वारा व पावसाने हजेरी लावली. ७ आणि ८ मेला सुद्धा पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडल्याने बहुतांश भाग अंधारात होता. ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
शेतीपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे घरांचे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी तत्काळ नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील ९५ पक्क्या घरांचे तर २८ कच्च्या घरांचे नुकसान झाले असून, वसई तालुक्यात ८७ पक्की घरे, ५५ कच्ची घरे, जव्हार तालुक्यातील २०१ पक्क्या घरांचे मोखाडा तालुक्यातील १२९ पक्की घरे आणि ३० कच्ची घरे, पालघर तालुक्यातील ४४८ कच्ची घरे तर १०२ पक्की घरे, डहाणू तालुक्यातील ५९७ पक्की आणि ५१ कच्ची घरे, विक्रमगड तालुक्यातील १७८ पक्की आणि २८ कच्ची घरे आणि तलासरी तालुक्यातील ७२ पक्क्या घरांचे तर ५५ कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
वादळी वारा आणि पावसाने जिल्ह्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात येईल.
- सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर