Wednesday, May 21, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजLifestyle'ती'ची गोष्ट

Fruit Peel Skincare : 'या' फळांच्या साली चेहऱ्याला ठेवतील टवटवीत!

Fruit Peel Skincare : 'या' फळांच्या साली चेहऱ्याला ठेवतील टवटवीत!

आपण आजारी पडल्यावर आपल्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण आपल्या आवडीची फळे खातो देखील पण फळे खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्याची साल कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फळं तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहेत तितकीच त्यांची साल देखील फायदेशीर आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर टॅनिंग, सनबर्न, डलनेस यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे, तुम्ही बाजारातून केमिकलयुक्त उत्पादने खरेदी करणे तर थांबवालच पण सोबतच तुमच्या त्वचेवर या केमिकल्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही तुम्हाला आराम मिळेल.



प्रत्येक महिलेला चमकदार आणि डागरहित त्वचा हवी असते आणि त्यासाठी बहुतेक महिला महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितले की अशा समस्या फक्त काही नैसर्गिक वस्तूंनी सोडवता येतात तर? बरं, हा लेख स्वयंपाकघरातील घटकांसह त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्सबद्दल नाही, तर काही सोप्या फळांच्या सालींच्या मदतीने चमकदार त्वचा मिळविण्याबद्दल आहे. ही साले तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जातात आणि चेहऱ्यावर त्वरित चमक आणू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या लेखातून अशी कोणती फळे आहेत ज्यांच्या साली आपण स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करू शकतो.




संत्र्याच्या सालीची कमाल


संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक तेल भरपूर प्रमाणात असते, जे एक चांगले एक्सफोलिएटर मानले जाते. जेव्हा तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करता तेव्हा ते मुरुमे, काळे डाग कमी करण्यास मदत करते आणि कोलेजन तयार होण्यास मदत करते. यासाठी, सर्वप्रथम संत्र्याची साल वाळवा आणि त्याची पेस्ट बनवा, त्यात दही घाला, त्यात २ चमचे कोरफडीचे जेल आणि लिंबाचा रस घाला. मग ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून चेहरा धुवून टाका.




पपईची साल देईल चमकदार त्वचा


पपईची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा, नंतर त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून फेसपॅक बनवा. आता ते १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. कारण पपईच्या सालीमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे टॅनिंग कमी करण्यास मदत करते. पिंपल्स घालवण्यास मदत करते, त्वचेला उजळ बनवते आणि तिला मऊ देखील करते. काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा ते वापरू शकता.




डाळिंबाची साल आहे त्वचेसाठी वरदान


डाळिंबाच्या सालीचा फेसपॅक म्हणून वापर करण्यासाठी, साली उन्हात वाळवा आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा आणि गुलाब पाण्यात मिसळा आणि चेहऱ्याला १० मिनिटे लावा. तुमची त्वचा चमकदार आणि सॉफ्ट होईल.



किवीची साल चेहऱ्याला ठेवेल टवटवीत


अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले किवीचे साल तुमच्या त्वचेची चमक वाढवू शकते. ते वापरण्यासाठी, किवीची साल तुम्ही चेहऱ्याला लावून मसाज करू शकता किंवा किवीच्या सालीची पेस्ट बनवा त्यात एक चमचा दही मिसळा. हे मिश्रण डोळ्यांना टाळून तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. किवीमधील नैसर्गिक आम्ल मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात, रंग उजळवतात आणि निरोगी चमक देतात. ताजेतवाने, चमकदार त्वचा दिसण्यासाठी कोमट पाण्याने हळूवारपणे धुवा.



केळीची साल उजळवेल त्वचा


केळीच्या सालीच्या पांढऱ्या तंतूंमध्ये कोरफडीचे जेल मिसळा आणि ते डोळ्यांखाली लावा, यामुळे डार्क सर्कलच्या समस्येपासून आराम मिळतो किंवा केळीच्या सालीवर थोडी हळद आणि मध घ्या आणि चेहऱ्यावर लावून मसाज करा. १५-२० मिनिटे तसेच ठेऊन नंतर चेहरा धुवा. केळीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे डाग कमी करण्यास मदत करतात आणि सूज, मुरुम, जळजळ इत्यादी त्वचेच्या समस्या कमी करतात.

Comments
Add Comment