
७० टक्के काम पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा
बदलापूर: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना बदलापूर शहरातील नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच मागील आठवड्यापासून संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस पडत असल्याने स्टेशन परिसरातील सखल भागात गुडघ्यापेक्षा अधिक पाणी भरते. परिणामी, रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडीत अजूनच भर पडते. शहरातील १३ मुख्य नाल्यांसह इतर लहान नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून मे अखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण होईल, असा दावा नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विहित वेळेत नालेसफाई झाली नाही आणि रोजच अवकाळी पाऊस पडला तर यावर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरात काही ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत तर काही नाल्यांवर भराव टाकून हे नाले अनैसर्गिक पद्धतीने वळविण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झाल्याने नाल्यामध्ये साचलेला गाळ, नागरिकांकडून नाल्यात फेकला जाणारा कचरा, राडारोडा, झाडे-झुडपे तसेच होत असलेली अतिक्रमणे यामुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. काही नाल्यांच्या कडेला काढलेला कचरा आणि राडारोडा तसाच ठेवल्याने त्या ठिकाणाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांना तसेच तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच नगर अभियंता विजय पाटील यांच्यासह शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची तसेच पावसाळ्यात पाणी साचत असलेल्या भागांची पाहणी केली. यावेळी पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी युद्धपातळीवर नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हे काम अधिक जलद गतीने केले तरच प्रशासनाने दावा केल्याप्रमाणे ३० मे पर्यंत नालेसफाई पूर्ण होईल. दरम्यान असे असले तरी गौरी हॉल ते नदीपर्यंतचा नाला, बॅरेज रोड ते बॅरेज डॅम आदींसह सुमारे २५ लहानमोठ्या नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून नागरिक व वहान चालकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
मोठ्या नाल्यांची जेसीबी, पोकलेनद्वारा सफाई
बदलापुरात १३ मुख्य नाल्यांसह ३८ मोठे नाले आहेत, तर २५ लहान नाले आहेत. यातील सर्व मुख्य व मोठ्या नाल्यांची जेसीबी व पोकलेन आदी यंत्रांचा वापर करून सफाई करण्यात येत आहे, तर लहान नाले अरुंद असल्याने त्यामध्ये सफाईसाठी जेसीबी, पोकलेनचा वापर करता येत नाही. त्यामुळे अशा नाल्यांची मनुष्यबळाचा वापर करून सफाई करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक आकेश म्हात्रे यांनी दिली.