Wednesday, May 21, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

दहशतवादी आमिर हमजावर गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी

दहशतवादी आमिर हमजावर गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी

इस्लामाबाद : बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा लाहोरमध्ये राहत्या घराजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला असून लाहोरमधील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्यावर गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत मौन बाळगले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, हमजा आपल्या लाहोरमधील निवासस्थानी अपघातात जखमी झाला असून, त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या वृत्तांनुसार, हमजावर गोळीबार झाला असा दावा करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी तपास केल्यानंतर या दाव्यांचे खंडन करण्यात आले असून, अधिकृत सूत्रांनी घटनास्थळी गोळीबाराचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे सांगितले आहे. तरीही, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत स्पष्टता नाही, त्यामुळे घातपाताची शक्यता अजूनही पूर्णतः नाकारलेली नाही.



अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असून, आमिर हमजाला देखील नामांकित दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे.त्याने लष्कर ए तोयबाच्या केंद्रीय समितीमध्ये काम केले असून, निधी उभारणी, भरती आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


२०१८ मध्ये, लष्करशी संबंधित जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांवर पाकिस्तान सरकारने आर्थिक निर्बंध घातल्यानंतर हमजाने लष्कर-ए-तोयबापासून स्वतःला दूर केल्याचे सांगितले जाते.त्यानंतर त्यांनी जैश-ए-मनकफा नावाची वेगळी संघटना स्थापन केली, जी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालू ठेवण्यासाठी असल्याचा आरोप आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, जैश-ए-मनकफा ही नवीन संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत असून, आमिर हमजा अजूनही लष्कर-ए-तोयबाच्या नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे म्हटले जाते.या घटनेनंतर पाकिस्तानातील अधिकृत यंत्रणांकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद देण्यात आलेला नाही. अशा संवेदनशील प्रकरणावर मौन राखण्यात येत आहे, ज्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे.

Comments
Add Comment