Saturday, August 30, 2025

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बसमध्ये बॉम्बस्फोट, पाच ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बसमध्ये बॉम्बस्फोट, पाच ठार
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातल्या खुजदार जिल्ह्यात एका शाळेच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात एक बॉम्बस्फोट झाला. स्फोटात तीन मुले आणि दोन नागरिक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात एकूण ४० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने प्रसिद्धीपत्रक काढून बॉम्बस्फोटाची माहिती दिली आहे. तसेच स्फोट करणाऱ्या अज्ञातांचा निषेध केला आहे. पण या स्फोटानंतर पाकिस्तानमधीलच अनेकांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्याप पाकिस्तान सरकारने तसेच पाकिस्तानच्या लष्कराने दिलेले नाही. बलुचिस्तान प्रांताच्या शिक्षण मंत्रालयाने १६ मे २०२५ रोजी प्रसिद्धीपत्रक काढून १७ मे २०२५ पासून उन्हाळी सुटी जाहीर केली होती. सुटी सुरू असताना आणि शाळा बंद असताना विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस कुठे जात होती आणि का, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मृतदेहांचे लष्करी रुग्णालयात पोस्टमॉर्टेम सुरू आहे. जखमींवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments
Add Comment